धुळे। तालुक्यातील जुनवणे ग्रामपंचायतीत सरकारी नियम डावलून रोजगार हमी योजना राबविताना शासकीय रक्कमेचा अपहार केला म्हणून तत्कालीन दोघा ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भगवान पाटील यांनी तालुका पोलिसात ही तक्रार केली आहे.
जुनवणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुरेखा ढोले व संदीप बागुल या दोघांनी जुलै 2011 ते एप्रिल 2016 दरम्यान शासकीय नियमांची पायमल्ली करुन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व निर्मल भारत अभियानाच्या योजनेतील सुमारे 12 लाख 65 हजार 942 रुपयांच्या अनुदानाचा अपहार केला. त्यासाठी त्यांनी बनावट दस्ताऐवज तयार करुन शासनाची फसवणूक केली.विस्तार अधिकारी भगवान पाटील यांच्या या तक्रारीची दखल घेत तालुका पोलिसांनी जुनवणे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक सुरेखा ढोले व संदीप बागुल या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मांडेकर करीत आहेत.