नंदुरबार: गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजुरीसाठी गेलेले जिल्ह्यातील 1500 आदिवासी मजूर श्रमीक एक्सप्रेसने नंदुरबारला परतले. या मजूरांना आपल्या गावी आणण्यासाठी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व मजूरांना राज्य परिवहन महामंडळाच्या 52 बसेसने त्यांच्या गावी पाठविण्यात आले.
याप्रसंगी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर.तडवी, पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विविध भागातील हे मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर या मजूरांकडून आपल्या मुळ गावी जाण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासर्व मजूरांना आणण्यासाठी विशेष श्रमीक रेल्वेची व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी राज्याच्या मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन सचिवांना दिले होते. त्यांनी गुजरातमधील प्रशासनाशी संपर्क साधला होता. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी या संदर्भात जुनागढ प्रशासनाशी समन्वय साधला. या प्रयत्नांमुळे हे सर्व मजूर सुखरुप नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहचले.