शेतकर्यांना एकरी 60 हजार रुपये खर्च
शिरूर : कांद्याला योग्य बाजारपेठ मिळावी व साठवण क्षमता वाढण्यासाठी सरकारने शेतकर्यांना अनुदान देऊन कांदा चाळी बांधल्या. आयात-निर्यातीचे धोरण चुकीच्या पद्धतीने राबविल्याने कांद्याचे भाव पडले. भविष्यात भाव मिळेल या अपेक्षेने ठेवलेला कांदाचाळीत सडू लागला आहे. यामुळे पंचनामा करण्याची मागणी शेतकर्यांमधून येऊ लागली आहे.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. गेल्या वर्षी शेतकर्यांनी घोड व कुकडी नद्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन केले. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतीचा कांदा पिकविण्यात आला. यासाठी जवळपास एकरी 60 हजार रुपये खर्च करण्यात आला. काही शेतकर्यांनी मिळेल त्या भावात कांदा विकला. केंद्र सरकारने कांदाचाळीसाठी अनुदान दिले असले तरी कांदाचाळी उभारण्यासाठी शेतकर्यांनी कर्ज घेतलेले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याच पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकर्यांवर कर्जाचा बोजा वाढला आहे. यावर्षी कांद्याला भाव मिळेल, अशी आशा असताना नवीन कांदा बाजारात आला, तरी कांद्याचे भाव स्थिर राहिले. त्यातून बाजारपेठेत जुना कांदा आणू नये, असे फलक झळकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जुन्या कांदा चाळीतून आता पाणी निघून कांदा सडण्याचा प्रकार होत आहे.