जुना नाका पाडण्याच्या वादातून नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यावर हल्ला

शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

जळगाव । शिवाजीनगरातील जुना जकात नाका पाडण्याच्या कारणावरुन नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यावरकाही अवैध व्यावसायिकांनी शनिवारी दुपारी हल्ला केला. यात दारकुंडे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शिवाजीनगरामधील जुना जकात नाका सध्या निरुपयोगी झाला आहे. त्या ठिकाणी अवैध दारू विक्री व जुगाराचा व्यवसाय चालतो. या प्रकारामुळे या ठिकाणी दारुडे, जुगारी गोंधळ घालतात. त्यांच्या उपद्रवाला परिसरातील नागरिक कंटाळले आहेत. काही उपद्रवी तरुण महिलांची छेड काढत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी नगरसेवक दारकुंडे यांच्याकडे केली. याप्रकरणी त्यांनी हा जुना जकात नाका पाडण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला. ते बांधकाम पाडण्याच्या कामाला प्रशासनाने परवानगी दिली. हा नाका पाडण्यासाठी महापालिकेचे पथक शनिवारी नाक्यावर गेले. या पथकात जेसीबी, ट्रॅक्टरसह कर्मचारी नाक्याजवळ गेले. परंतु, भोई नामक अवैध दारू विक्रेत्याने नगरसेवक दारकुंडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यानंतर महेश पवार, त्याचा भाऊ, अजय तांबोळी व इतर दोन अशा पाच जणांनी नगरसेवकांवर हल्ला केला. त्यांच्यावर दगडफेकही झाली. याप्रकरणी नवनाथ दारकुंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार झाला. त्यानंतर आता शिवाजीनगरात नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यावर हल्ला झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.