जुना हिशोब चुकता करणार?

0

कोलंबो । श्रीलंकेच्या दौर्‍यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. कसोटी मालिकेत भारताने यजमान संघाला 3-0 असे धुवून काढले. आता भारतीय संगाने आपले संपूर्ण लक्श पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर केंद्रित केले आहे. कोहली आणि कंपनीचा सध्याचा फॉर्म बघता यावेळी भारतीय संघ मोठे यश मिळवेल असा अंदाज आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ टिकेच्या भोवर्‍यात सापडला आहे. लंकेच्या माजी दिग्गज खेळाडूंनी संघावर टिकेची झोड उठवताना, एवढी वाईट दुर्दशा कधी पाहिली नव्हती असे म्हटले आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेप्रमाणे या एकदिवसीय मालिकेतही यजमान संघावर निर्भेळ यश मिळवण्यासाठी उत्सुक आहे. तर श्रीलंकेच्या संघाला मायदेशात आपली अब्रु कशी वाचवायची असा प्रश्‍न पडला आहे.

प्रयत्नांना यश नाही
भारताने 1985-86 च्या हंगामात श्रीलंकेत पहिल्यांदा तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. त्यानंतर भारताने 1993 मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. यावेळीही भारताने तीन एकदिवसीय मालिका खेळली होती. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताने आघाडी मिळवली. पण त्यानंतर पुढचे दोन्ही सामने जिंकून श्रीलंकेने मालिका जिंकली. 1997 मध्ये तर श्रीलंकेने भारताला चारी मुंड्या चित केले. मागील काही वर्षांपासून भारतीय संघ श्रीलंकेत एकदिवसीय क्रिकेटची मालिका जिंकत आला आहे.

भारतासमोर मोठे आव्हान
पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला क्लिनस्विप देणे हे सोपे असणार नाही. भारताचा श्रीलंकेचा हा आठवा दौरा आहे. आतापर्यत भारतीय संघाला श्रीलंकेला एकदाही क्लिन स्विप देता आलेली नाही. पण श्रीलंकेने भारताला मात्र धूळ चारलेली आहे. मागील काही वर्षांपासून भारतीय संघ श्रीलंकेत एकदिवसीय मालिका जिंकत आला आहे पण क्लिन स्विप हे भारतासाठी अजूनही स्वप्नवत ठरलेले आहे. 1997 मध्ये भारताने श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौर्‍यात भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने भारताला अवघ्या दोन धावांनी हरवले. त्यानंतर पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये श्रीलंकेने भारतावर सहज विजय मिळवले होते. एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील भारताचा श्रीलंकेतील हा सर्वात मोठा पराभव होता. या पराभवाची परतफेर करण्याची संधी आता भारताला मिळाली आहे.

असा आहे आलेख
भारतीय संघाने श्रीलंकेत एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या एकुण सात मालिका खेळल्या आहेत.
भारतीय संघाने मालिका जिंकल्या आहेत, पण एकदाही त्यांना श्रीलंकेला क्लिनस्विप करता आलेले नाही.
1997 मध्ये मिळालेल्या क्लिनस्विपचा भारतीय संघ हिशोब चुकता करणार का? याची उत्सुकता आहे.