जुनी प्रिंप्राणी येथे वीज, रस्त्याची मागणी

0

शहादा  । तालुक्यातील जुनी पिंप्राणी येथे दळणवळणासाठी रस्ता तयार करण्यासह विजपुरवठा उपलब्ध करुन देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. यासंदर्भात त्वरित आदेश न दिल्यास 6 मार्च रोजी मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विविध सुविधांपासून ग्रामस्थ वंचित
शहादा तालुक्यात दरा गावाजवालील 100 टक्के आदिवासी वस्ती असलेले जुनी पिंप्राणी या गावात वीजपुरवठा व रस्त्यांची सुविधा नाही. जुनी पिंप्राणी येथे साधारण 70 ते 80 घर असून सुमारे 500 लोकसंख्या आहे. स्वातंत्र्याचा 70 वर्षानंतरही या गावात जाण्यासाठी रस्ता, विद्युत पुरवठा नाही. गावात प्राथमिक शाळा 5 वी पर्यंत असून पुढील शिक्षणासाठी म्हसावद तथा शहादा येथे जावे लागते. यासाठी विद्यार्थ्याना दरा किंवा पिंप्राणी गावापर्यंत सुमारे 3 किमी पायपीट करावी लागते. विद्युत पुरवठा नसल्याने सर्वत्र अंधार असतो, पिठाची गिरणी नाही, जिवनावश्यक वस्तुसाठी पायपीट करावी लागते. पाणी पिण्यासाठी हातपंपाचा वापर
करावा लागतो.

अन्रथा मनसे स्टाईल..
रेशन आणण्यासाठी पिंप्राणी गावी पायी जावे लागते. रस्ता, विज, पाणी, आरोग्य अशा आवश्यक गरजांपासून आजही जुनी पिंप्राणी गाव वंचित आहे. संबंधित खात्याना आपण त्वरीत आदेश न दिल्यास 6 मार्च 2018 रोजी मनसे स्टाइलने आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे जिल्हा सचिव मनलेश जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत दिला आहे.