धुळे। गोमांस खाणारे असे हिणवत एका टोळीने मथुरा पॅसेंजरमधून प्रवास करणार्या 15 वर्षांच्या जुनैद खानची हत्या केली होती. तपास सुरु असतानाच हरियाणातील फरीदाबाद रेल्वे पोलिसांनी धुळ्यात येऊन मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर कऱण्यात येणार आहे. जुनैद खानची चाकू भोसकून हत्या केल्याची कबुली आरोपीनें दिल्याचें पोलिसांनी सांगितले.
रेल्वेतून उतरल्यावर भोसकले
हरियाणातील बल्लभगडवरुन परतत असताना जुनैदची हत्या करण्यात आली होती. रेल्वे प्रवासात आसनावरून जुनैद आणि त्याच्या भावंडांचे एका टोळीशी भांडण झालें होतें. नंतर त्या तरुणांनी ‘गोमांस खाणारे’ म्हणत जुनैद आणि त्याच्या भावंडांच्या डोक्यावरील टोपी उडवली व दाढी खेचली. भांडणानंतर जुनैद रेल्वे स्थानकावर उतरला. तेथेही तरुणांनी त्यांना मारहाण केली. एकाने जुनैदला चाकूने भोसकले. त्यात जुनैदचा मृत्यू झाला होता. जुनैदच्या हत्येनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. हरियाणामधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावले जात होतेे. मुख्यमंत्री खट्टर यांनी आश्वासन दिल्यानंतर पोलीस कामाला लागले होते. चौघांना अटक केली होती. दरम्यान नरेंद्र इंद्रसिंग जाटला असे आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अधिकृत दुजोरा मिळत नव्हता.
नावाबाबत मुद्दाम गोपनियता
आरोपींबाबत ठोस माहिती देणार्यांना 2 लाखांचें बक्षीस पोलिसांनी जाहीर केलें होते. तपास सुरु असताना रेल्वे पोलिसांनी मुख्य आरोपीला धुळे येथून अटक केली आहे. त्याचें नाव गुप्त ठेवण्यात आले असून हत्येची कबुली त्याने दिली आहे. जुनैद खानची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीदेखील जुनैदच्या हत्येवर प्रतिक्रिया दिली. जुनैदची हत्या ही अत्यंत क्रूर घटना असून या घटनेचा आम्ही विरोध करतो. दोषींना कठोर शिक्षा होणारच असे त्यांनी सांगितले.
माझा मुलगा भारतीय नव्हता का?
जलालुद्दीन खान यांच्या मुलाची ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेवरुन जलालुद्दीन खान यांनी पंतप्रधान मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत. ‘देशात मुस्लिमांबद्दल एवढा तिरस्कार का?, माझा मुलगा भारतीय नव्हता का?, त्याचा दोष काय होता?, जमावाकडून मुस्लिमांच्या होणार्या हत्यांबद्दल पंतप्रधान मोदी मौन केव्हा सोडणार?,’ असे प्रश्न जलालुद्दीन खान यांनी उपस्थित केले आहेत. ‘
…. तर विश्वास मजबूत झाला असता
‘पंतप्रधान मोदी या घटनेबद्दल काही बोलले असते, तर माझा, माझ्या कुटुंबीयांचा आणि माझ्या समुदायाचा तुटलेला विश्वास मजबूत झाला असता. आम्ही खूपच असुरक्षित आहोत आम्हाला खूपच असहाय्य वाटत आहे,’ असेदेखील जलालुद्दीन खान यांनी म्हणाले. माझ्या इतर मुलांची अवस्था जुनैदसारखी होणार नाही, याची काळजी पंतप्रधान मोदींनी घ्यावी, अशी विनंतीदेखील त्यांनी केली. जुनैदच्या वडिलांनी मोदी यांना उद्देशून केलेली विधाने सर्वच राजकीय नेत्यांना विचारात टाकणारी आहेत. मात्र राजकारणात त्याबाबत पडसाद अपेक्षेप्रमाणे उमटले नाहीत.
‘मन की बात’ ऐकली
‘वाढत्या तिरस्काराच्या भावनेमुळे मी माझा मुलगा गमावला. ही माझी ‘मन की बात’ आहे आणि ही ‘मन की बात’ मोदी साहेबांपर्यंत पोहोचावी, अशी माझी इच्छा आहे. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळूनही, सारे कुटुंब शोकाकुल असूनही रविवारी ग्रामस्थांसोबत पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ ऐकली,’ असे जलालुद्दीन खान यांनी सांगितले. ‘पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये माझा मुलगा जुनैदच्या हत्येबद्दल एक शब्ददेखील नव्हता. आम्हाला मोदींकडून वेगळ्या अपेक्षा होत्या,’ असे जलालुद्दीन यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी 15 वर्षीय जुनैदच्या हत्येबद्दल तीव्र संताप व्यक्त करतील किंवा किमान निषेध तरी करतील, अशी आशा जलालुद्दीन खान यांना होती. जुनैदच्या वडिलांनी मन की बात या कार्यक्रमात दखल घेतल्या जाणार्या मुद्द्यांच्या प्राधान्यक्रमावरच बोट ठेवत अप्रत्यक्ष पणे सामाजिक जीवना बद्दलच्या राजकीय नेत्यांच्या आकलनशक्तीवरच टीका केली आहे. या टीकेमुळे भाजपसह सत्ताधारी आघाडीतील सर्वच महत्वाच्या नेत्यांची बोलती बंद झाल्याने व्यंकय्या नायडू वगळता अन्य नेते या टीकेचा मुद्देसुद प्रतिवाद करुन शकलेले नाहीत, अशा प्रतिक्रिया लगेच समाज माध्यमांमधून उमटलेल्या आहेत. जुनैदच्या वयाचा विचार करता तो कोणत्या वादात पडणारा असूच शकत नव्हता तरीही त्याला विनाकारण जीवाला मुकावे लागलेले आहे.
गुप्ततेबद्दल तर्कवितर्क
या आरोपीच्या अटकेच्या कारवाईला दुजोरा देण्यापेक्षा जास्त माहिती देण्यास स्थानिक पोलीस तयार नव्हते. फरीदाबादच्या पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असली तरी स्थानिक पोलिसांच्या मदतीशीवाय ही कारवाई शक्य नव्हती. पोलीस आरोपीचे नाव सांगू शकत नसल्याने आरोपी हरियाणातील मातब्बर राजकीय शक्ती असलेल्या लोकांशी सबंधीत असावा. किंवा त्याची वैयक्तीक पार्श्वभूमी समाजात तणाव वाढण्यास कारण ठरेल. अशी संवेदनशील असावी, अशी चर्चा धुळ्यात होती.