मुंबई – जुनैद खान या मुस्लिम धार्मीक अल्पसंख्याक नागरिकाची भररस्त्यात हत्या करणाऱ्या गुंडांना लवकरात लवकर फाशी द्या ही मागणी करत बुलढाण्याती आणि मुंबईतील काही सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. बुलढाणा येथे चर्मकार महिलेला भररस्त्यावर विवस्त्र करुन तिचा विनयभंग करणाऱ्या गुंडांचे जामिन रद्द करुन त्यांना अटक करुन मुख्यमंत्री फंडातून त्या पीडित महिलेला आणि तिच्या कुटूंबियांना 25 लाख भरपाई दिली जावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
50 वर्षीय चांभार जातीच्या राधाबाई उंबरकर या पती गुलाबराव उंबरकर आणि मुलगा रविंद्र उंबरकर यांच्या समवेत रुईखेड येथे गावाकडे जात असताना मराठा जातीतील आरोपी सखाराम रामराव उगले आणि इतर 8 ते 10 लोकांनी त्यांना मंडळी जमवून राधाबाई, गुलाबराव आणि त्यांच्या मुलगा यांना बैल चोरीच्या आरोपावरुन काठ्यांनी, लाथाबुक्यांनी मारहाण केली. राधाबाई हिला विवस्त्र करुन तिचा विनयभंग करण्यात आला. त्याचबरोबर जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. राधाबाई यांच्या आरोपावरुन 23 जणांना अटक करण्यात आली होती तर काही दिवसांपूर्वी हरयाणातील 15 वर्षीय जुनैद खान यांनी मांस विक्री करण्याची संशयाने काही गोरक्षकांनी हत्या केली. यांच्या निषेधार्थ कायदा हातात घेण्याचा हक्क या गुंडांना आहे का असा सवाल विचारत डॉ. भालचंद्र मुनगेकर, युवराज मोहिते, अच्युत भोईटे, शशांक कांबळे आणि सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी शुक्रवारी आझाद मैदान येथे आरोपींना फाशी झालीच पाहिजे असे नारे देत धरणे आंदोलन केले. आता सरकार याच्यावर काय भूमिका देते याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.