बोदवड तालुक्यावर संकट ; साळशिंगीची तरुणी अद्यापही बेपत्ताच
भुसावळ- बोदवड तालुक्यावर गुरुवारच्या पावसामुळे चांगलेच संकट कोसळले असून नदी-नाल्यांना पूर आल्याने साळशिंगी येथील 16 वर्षीय तरुणीत नाल्यात वाहून गेल्याची घटना ताजी असताना गुरुवारी सायंकाळी बकर्या चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. रतन देवसिंग तोरे (55) असे मयत गुराख्याचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी तोरे हे आपल्या बकर्यांना चारण्यासाठी फरकांडे शिवारात गेले होतेे. सायंकाळी गावाकडे बकर्या परतल्या मात्र तोरे न आल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. शुक्रवारी सकाळी बोदवड ग्रामीण रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेस तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दुजोरा दिला.
साळशिंगीची तरुणी अद्यापही बेपत्ताच
साळशिंगी-उजनी गावादरम्यानच्या नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर आल्यानंतर पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटल्याने शेतकरी सोपान चौधरी, त्यांची पत्नी रेखाबाई, मुलगा ऋषीकेश व 16 वर्षीय मुलगी विद्या पुराच्या पाण्यात अडकले मात्र पती-पत्नीसह मुलाने झाडाच्या मुळांना घट्ट आवळल्याने ते बचावले होते तर हात सुटल्याने विद्या पुराच्या पाण्यात वाहिली होती. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेवूनही विद्या आढळली नव्हती तर शुक्रवारी भुसावळ येथून आलेल्या पट्टीतील पोहणार्यांनीदेखील शोध घेतला मात्र यश आले नाही. पाण्यात गाळ असल्याने गाळात तरुणी अडकल्याचा संशय आहे. दुपारनंतर पुन्हा शोध कार्यास वेग देण्यात येणार आहे.