जुन्नरमध्ये आरएसएसचा मूकमोर्चा

0

जुन्नर । राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर जात असताना त्यांच्यावर गुडांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. त्याच्या निषेधार्थ नागरी सुरक्षा समितीतर्फे रविवारी जुन्नरमध्ये मूकमोर्चा काढण्यात आला होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या मागण्या
जुन्नर पोलिसांनी गुंडाच्या दबावाला बळी पडून त्यांच्या बाजूने तक्रार नोंदवून घेतली आहे. ही नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारी घटना आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास घोडके, सहायक पोलिस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबीत करण्यात यावे. तसेच परिसरात धुडगूस घालणार्‍या गुंडाविरोधात गुन्हा दाखल करावा, महिलांसाठी निर्भया पथकाची निर्मिती करण्यात यावी, गोवंश रक्षणासाठी पोलिसांचे एक पथक तयार करावे, जुन्नरच्या अती संवेदनशील भागात पोलीस चौक्या तयार कराव्यात, परिसरात गस्त वाढवावी या मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या मोर्चाचे संयोजन शामराव धुमाळ, संदेश भेगडे यांनी केले.

तहसीलदारांना निवेदन
सकाळी 11 वाजता शिव छत्रपती प्रवेशद्वारापासून मोर्चाला सुरुवात झाली. तेथून हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पुणे विभागाचे संघचालक उपस्थित होते. मोर्चात सुमारे 5 हजार नागरिक व संघ स्वयंसेवक सहभागी झाले होते. तहसीलदार किरण काकडे यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले.