नारायणगाव । उच्च न्यायालयाच्या डीजे बंदीचा आदेश डावलून जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात गणपती विसर्जनाला पोलिसांच्या उपस्थितीत डीजे वाजवून गणपती विसर्जन करण्यात आल्याने पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी डीजे बंदी संदर्भात चालविलेली कठोर अंमलबजावणीला पोलिसांकडूनच खो घालण्यात येत आहे.
लावण्यात आले 4 ते 5 डीजे
जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंद्रे या गावात गणपतीच्या पाचव्या दिवसांच्या विसर्जनासाठी अनेक मंडळांनी दुपारी 5 वाजता, रात्री 8 ते 10 मोठे साउंड बॉक्स असलेले सुमारे 4 ते 5 डीजे लावून रात्री 11च्या सुमारास गणपती विसर्जन केले. विशेष म्हणजे या विसर्जन मिरवणुकीला पोलीस बंदोबस्त होता. दोन कर्मचारी यावेळी उपस्थित होते. त्यांनीही मूकसंमती देऊन डीजे वाजवून दिला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी ध्वनी प्रदूषणाची कठोर अंमलबजावणीसाठी जागृती केली आहे.
प्रभारी अधिकार्यांवर कारवाईचे आदेश
जुन्नर येथील मागील आठवड्यात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक हक यांनी तसे आदेश पोलीस अधिकारी व सर्व नागरिकांना आवाहन केले होते. जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अधीक्षकाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता कायद्याचे उल्लंघन केले आहे. मात्र जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचार्याकडून उल्लंघन होत आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत होईल तेथील प्रभारी अधिकार्यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जुन्नर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांनी जुन्नरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांना चौकशी करून डीजे चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देऊन पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.