जुन्नर । हिवरे खुर्द येथील जाधवमळ्यात पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली. संबंधित महिला ऊस तोडणी कामगार असून तिला उपचारार्थ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वन विभागातून सांगण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्या महिलेचे निधन झाले. सध्या ऊसतोडणी सुरू असून बिबटे ऊसतोडणीमुळे शेताबाहेर पडत असून जुन्नर तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
वनपरिक्षेत्र अधिकारी जयवंत पिसाळ, वनपाल ज्ञानेश्वर साळुंके, मनिषा काळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे यांनी येऊन जखमी महिला व त्यांच्या कुटुंबाला धीर दिला. महिला गंभीर जखमी असल्यामुळे ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. श्रीहरी सारोक्ते, डॉ. यादव शेखरे, डॉ. राहुल तांबे, डॉ. योगेश तांबे, डॉ. सुशील बागुल, पानमन सिस्टर यांनी उपचार केले.
ससूनमध्ये सविता यांचे निधन
जुन्नर तालुक्यातील यावर्षीचा बिबट्याच्या हल्यातील हा पहिला बळी आहे. सविता भिमराव वायसे (30 रा. माळेगाव, बीड) असे महिलेचे नाव असून त्यांचे उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे साडेचार वाजता ससून रुग्णालयात निधन झाले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. त्यांच्या वर हिवरेखुर्द ता. जुन्नर येथील जाधव मळ्यात रविवारी पहाटे साडेपाच वाजता दरम्यान ऊसतोड करताना बिबट्याने प्राण घातक हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तालुक्यातील अंदाजे 48 गावे बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून आधीच वनविभागाने घोषित केली आहेत. सविता वायसे यांच्या वारसाला शासकीय नियमानुसार वनविभागाकडून आठ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे वनविभागाच्या सुत्राकडून सांगण्यात आले.
उदापूरमध्ये अकरा बकर्यांचा फडशा
उदापूर (ता. जुन्नर) येथील मोरेची पाईन वस्तीमधील बिबट्याने हल्ला करून एका शेतकर्यांच्या गोठ्यातील अकरा बकरांचा फडशा पाडला. ही घटना रविवारी (दि. 21) पहाटेवेळी घडली. पहाटे विठ्ठल खंडू सस्ते या शेतकर्याच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून हल्ला चढविला. नुकतीच तीन चार दिवसांची जन्मलेली कॅरेटमध्ये ठेवलेली अकरा बकरांवर हल्ला करून ठार मारली. त्यातील चार बकरे खाल्लेल्या अवस्थेतील होती. 15 दिवसांची जन्मलेली सात बकरे बिबट्याने उचलून नेली. या घटनेची माहिती उदापूरचे माजी सरपंच बबन कुलवडे यांनी वन विभागाला कळविले. घटनास्थळी वनपाल एस. जी. मोमीन, एस. बी. महाले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान म्हणाले की, उदापूरच्या घटनास्थळी लवकरच पिंजरा लावला जाईल. तसेच शासकीय नियमानुसार भरपाई दिली जाईल. हिवरे खुर्द या ठिकाणी चार पिंजरे लावले आहेत.