चांगला बाजारभाव मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी समाधानी
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील जंबो द्राक्षांना परदेशात चांगला बाजारभाव मिळत असल्याने तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यात कुकडी प्रकल्पातील येडगाव, माणिक डोह, पिंपळगाव जोगे, वडज आणि चिल्हेवाडी ही पाच धरणे असल्याने तालुक्याचा पूर्णपणे कायापालट झालेला आहे. तालुक्यात कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणावरून कुकडी डावा कालवा आणि पिंपळगाव जोगे धरणावरून एक कालवा असे दोन कालवे बांधण्यात आल्यामुळे या कालव्याच्या जोरावर तालुक्यातील शेतकर्यांनी पालेभाज्या, तसेच ऊस, केळी ही पिके घेण्याबरोबरच द्राक्षे, आंबा, डाळींब ही पिके घेण्याचा कल वाढला आहे. विशेष करून जुन्नर तालुक्यातील जंबो, शरद, सीडलेस, तास, गणेश, दॉमसन या जातीच्या द्राक्षांना परदेशात चांगली मागणी असून चांगला बाजारभाव मिळत आहे.
हवामान बदलाचा फटका
जंबो जातीच्या द्राक्षांचे उत्पादन राज्यात जुन्नर तालुक्यात सर्वाधिक निघत असून, तालुक्यात द्राक्ष लागवडीसाठी सुमारे साडेचार ते पाच हजार एकर क्षेत्रावर लागवडी झालेल्या आहेत. गेल्या वर्षी सत्तर एकर क्षेत्रावर लागवडी झालेल्या होत्या, तर यावर्षी हवामानात अनेक वेळा बदल झाल्याने तसेच कमी प्रमाणात पाऊस झाल्याने याचा फटका शेतकर्यांना बसला. सप्टेंबर महिन्यात होणारी छाटणी पुढे ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली. त्यामुळे फळे धरायला उशीर लागला. सध्या तालुक्यातील राजुरी, बोरी बुद्रुक, तसेच ओझर, नारायणगाव परिसरात द्राक्ष तोडणी चालू असल्याचे तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांनी सांगितले.
तालुक्यात 810 निर्यातदार
कृषी विभागाकडे तालुक्यात 810 निर्यातदार शेतकर्यांनी 589 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षांची नोंदणी केलेली आहे, तर वातावरणातील वाढलेल्या थंडीमुळे फळात साखर तयार होणे आणि फुगवणे यावर परीणाम झालेला आहे. भविष्यात जंबो द्राक्षांना चांगला बाजारभाव मिळणार आहे, असे कृषी अधिकारी बापुराव रोकडे यांनी सांगितले.
आजपर्यंत 200 टन द्राक्षांची निर्यात
सध्या जुन्नर तालुक्यात जंबो द्राक्षांना परदेशात चांगला बाजारभाव मिळत असून, या द्राक्षांना प्रतवारीनुसार किलोला 110 ते 130 रुपयांचा बाजारभाव मिळत असून, दुय्यम दर्जाच्या द्राक्षांना 60 ते 70 रुपये बाजारभाव मिळत आहे. ही द्राक्षे श्रीलंका, चीन, रशिया, जर्मनी, युरोप, युको या ठिकाणी जात असून, तालुक्यातून आज अखेर पंधरा कंटेनरमधून 200 टन द्राक्ष या देशात निर्यात केली असल्याचे हिरामण शेवाळे यांनी सांगितले.