जुन्नर । राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत जुन्नर तालुक्यातील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षक यांची दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच कुरणमधील जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनीअरींग अँड पॉलिटेक्निक महाविद्यालयात संपन्न झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ व जुन्नर तालुका समन्वयक गुंजाळ यांनी दिली. जुन्नर तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व विविध शाळांचे 167 शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षक अशोक काकडे व सुनिल वाव्हळ यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
क्षमता-आवड-संधी ओळखून विद्यार्थ्यांना करिअर निवडीच्या संधी किती व कोणकोणत्या क्षेत्रात असू शकतात, कौशल्य विकसीत करून विकासाच्या संधी त्यांना कशा उपलब्ध करून देता येऊ शकतात हे प्रशिक्षणातून प्रशिक्षक अशोक काकडे यांनी सांगितले. तर शिक्षण प्रक्रियेत किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्या, व्यसनाधीनता, स्वमग्नता, अध्ययन प्रक्रियेतील अडचणी या सर्वांचा विचार करून 21 व्या शतकातील शिक्षकांची भूमिका काय पाहिजे हे प्रशिक्षक सुनिल वाव्हळ यांनी समजावून सांगितले.
शिक्षकांनी आत्मपरीक्षण करावे
आधुनिक व संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांपुढे जाताना शिक्षकांनी आत्मपरीक्षण करून आधुनिकीकरण, सोशल मीडियाचा वापर करून अध्यापन केले पाहिजे. शिक्षकांनी अपडेट असलेच पाहिजे. संवाद कौशल्य विकसीत केले पाहिजे, करीअर निवडी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. मुलांमधील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी उपयायोजना करणे अपेक्षीत आहे. अशा अपेक्षा शिक्षकांकडून असल्याचे या अविरत प्रशिक्षणातून समोर आले आहे.