स्वच्छता, पाण्यासाठी भरीव तरतूद
जुन्नर । जुन्नर नगरपरिषदेच्या 41 लाख 58 हजार 373 रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. मिळकतधारकांना आरोग्य विमा काढणारी जुन्नर नगरपरिषद ही पहिलीच नगरपालिका ठरली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष शाम पांडे यांनी दिली. जुन्नर नगरपालिकेच्या धर्मवीर संभाजीराजे सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात हा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, नगरसेवक दिनेश दुबे, जमीर कागदी, समीर भगत, अविन फुलपगार, भाऊ कुंभार, अक्षय मांडवे, फिरोझ पठाण, अविनाश कर्डीले, अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर, हजरा इनामदार, सना मन्सूरी, समिना शेख, मोनाली म्हस्के आदी याप्रसंगी उपस्थित होते.
नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न
शहरातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. या सभेमध्ये ठरविण्यात आलेल्या शहराच्या हिताच्या घटकांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे. शहरात सुधारणा करण्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष शाम पांडे यांनी केले आहे.
पाणीपट्टीत 100 रुपयांनी वाढ
या सभेत पाणीपट्टीमध्ये वार्षिक शंभर रुपये वाढ करण्यात आली. फ्लेक्सपासून उत्पन्न मिळत नसल्याने प्रशासनाला कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अन्यथा शहरामध्ये फ्लेक्स बंदी करण्याचे सांगण्यात आले. सर्वसाधारण स्वच्छता करामध्ये एका शौचालयास 100 रुपये घेण्यात येत असल्यामुळे गेली 20 वर्षे कोणत्याही स्वरुपाची वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे या पुढील काळात प्रत्येक शौचालया मागे 300 रुपये कर आकारण्यात येणार आहे. नगरपालिकेने हातगाडी झोन निश्चित करून हातगाड्या लवकरच अधिकृत करण्याचे ठरविले आहे.
अतिक्रमण फी वसूल करा
अग्निशमन वाहनाचा अनावश्यक वापर टाळून त्यावर फी आकारणी करणे, अतिक्रमण फी सक्तीने वसूल करणे, मांडव वाजंत्री फीची काटेकोर अंमलबजावणी करणे, नगरपालिकेच्या विविध विभागातील भंगाराच्या पुनर्निविदा करून त्याचा लिलाव करणे, पद्मावती तलावात मत्स्यबीज टाकून सदर तलाव ठेका पद्धतीने देणे, हिंदू दफन, दहनभूमी, मुस्लिम दफनभूमी याकरीता तरतूद करणे, स्वच्छता, पाणी, बांधकाम या बाबींवर भरीव तरतूद करणे, भुयारी गटार योजना राबविणे, कोंडवाड्यासाठी तरतूद करणे आदी ठराव यावेळी सभेमध्ये घेण्यात आले. तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजना, नागरी दलित वस्ती, दलितेत्तर वस्ती, चौदावा वित्त आयोग यावर चर्चा करून तरतूद करण्यात आली.