जुन्नर नगरपालिकेत शिवसेना व ‘आपला माणूस, आपली आघाडी’ची हातमिळवणी

0

जुन्नर । जुन्नर नगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. यात आरोग्य व पाणीपुरवठा अशा 2 समितीची सभापतीपदे शिवसेनेच्या वाट्याला आली. तर आपला माणूस आपली आघाडीला बांधकाम व महिला बालकल्याण विभाग तर राष्ट्रवादी काँग्रेसला वीज समितिचे सभापतीपद मिळाले. सर्वच समितीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.मागील वर्षी या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समनवय झाला होता. यावर्षी मात्र शिवसेनेने आपला माणूस आपली आघाडीशी संधान बांधल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका समितीच्या सभापती पदावर समाधान मानावे लागले.

राष्टवादीचे 8 नगरसेवक
मागील वर्षी नगरपालिका निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच विषय समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 3 समित्याची सभापतीपदे मिळाली होती. सभागृहात नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे. तर 17 पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, शिवसेनेचे 5 तर आपला माणूस आपली आघाडीचे 4 नगरसेवक आहेत.

समित्यांवर नियुक्त झालेले सदस्य
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कविता गुंजाळ, सुवर्णा बनकर, आविन फुलपगार, समीना शेख, अक्षय मांडवे यांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. आरोग्य समिती सभापतीपदी अंकिता गोसावी तर सदस्य म्हणून अविनाश करडीले, समीना शेख, मोनाली म्हस्के, सना मंसूरी, बांधकाम समिती सभापती हाजरा इनामदार, सदस्य आविन फुलपगार, सुवर्णा बनकर, फिरोज पठाण, अश्‍विनी गवळी, पाणीपुरवठा समितीच्या सभापती दीपेश परदेशी, सदस्य समीर भगत, नितीन गांधी, दिनेश दुबे, जमीर कागदी, वीज समिती सभापती अलका फुलपगार, सदस्य अविनाश करडीले, लक्ष्मीकांत कुंभार, जमीर कागदी, समीर भगत, नगराध्यक्ष शाम पांडे यांची निवड झाली आहे.

निधींचा पाठपुरावा
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नगरपालिका सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी तसेच शासन दरबारी निधींचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव व आमदार शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात आले. समिती वाटप संदर्भात हिंदू मुस्लिम सौहार्द जपण्याचा प्रयत्न केला आहे.
जमीर कागदी
गटनेते, आपला माणूस आपली आघाडी

चुकीच्या कामांना विरोध
शिवसेनेने आपल्या पक्षाच्या ध्येयधोरणांना बगल देत आपला माणूस आपली आघाडीशी केलेली अभद्र युतीमुळे नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी दाखविलेल्या विश्‍वावासाला सुरुंग लावला आहे. शिवसेनेने केलेल्या चुकीच्या कामांना विरोध केला म्हणून आम्हाला डावलण्यात आले.
– दिनेश दुबे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस

विकास हेच धोरण
विविध विषय समिती निवडणुकांमध्ये संख्याबळावर, दबावतंत्राने शिवसेनेलाच डावलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न होता. हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ दिला नाही. शहर विकास हेच आमचे धोरण आहे. सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काम करणार आहोत.
– शाम पांडे, नगराध्यक्ष