जुन्नर । पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या कार्यपद्धतीवर हरकत घेत त्यांच्या बदलीचा ठराव संमत करण्यात आल्याचा दावा पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, उपसभापती उदय भोपे, शिवसेना गटनेते दिलीप गांजाळे यांनी केला. तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठरावाच्या वैधतेबाबत आक्षेप घेतल्याने या ठरावाबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.
गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या बदलीचा ठराव पंचायत समितीच्या मागील महिन्यातील सभेत मांडण्यात आला होता. परंतु त्यावेळी देखील या ठरावावरून परस्पर विरोधी दावे करण्यात आले होते. या महिन्याच्या मासिक सभेत हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. शिवसेनेच्या 7, काँग्रेसचे उपसभापती उदय भोपे अशा 8 सदस्यांनी ठरावास पाठींबा दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच सदस्यांनी या ठरावाला विरोध केला. पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण यांनी ठरावाच्या सूचक होत्या. सदस्य रमेश खुडे ठरावाचे अनुमोदक होते, असे शिवसेना गटनेते दिलीप गांजाळे यांनी संगीतले.
गटविकास अधिकार्यांवर सदस्य नाराज
सभापती व सदस्य हे सभागृह चालविण्याची जबाबदारी असतानादेखील सभागृह सोडून गेले असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या अनघा घोडके यांनी सांगितले. जनतेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत गटविकास अधिकारी यांची कार्यपद्धती समाधानकारक नसल्याने हा ठराव घेण्यात आला असल्याचे सभापती ललिता चव्हाण यांनी सांगितले. तर पदाधिकारी व सदस्य यांचा अपमान या सभेत झाल्याने सभागृहातून जाण्याचा मार्ग स्वीकारल्याचे उपसभापती उदय भोपे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या सूचनेवरून सभेत अधिकारीदेखील आपली भूमिका योग्य बजावीत नाहीत, असा आरोप पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांनी केला.
गटविकास अधिकार्यांची बदली करा!
शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमात पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य कार्यक्रमांचे नियोजनात डावलण्यात आले. गटविकास अधिकारी हे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिकांच्या तक्रारींबाबत गंभीर नाहीत. विविध शासकीय योजना, घरकुले पाहणी, तपासणी, ग्रामसेवकांची कार्यपद्धती, प्रशासकीय अनागोंदी याला गटविकास अधिकारी जबाबदार आहेत. यासाठी त्यांची बदली करण्यात यावी, अशा आशयाचा ठराव मांडण्यात आला होता.