जुन्नर । रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झालेल्या जुन्नर-माणिकडोह रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी खामगाव, कबाडवाडी येथील तसेच परिसरातील युवकांनी कबाडवाडी येथील मुख्य चौकात रविवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प पडली होती. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
जुन्नर ते नाणेघाट रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून बिकट झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. येथे वारंवार अपघात होत आहेत. या मार्गावर माणिकडोह धरण, हडसर , निमगिरी हे किल्ले, नाणेघाट अशी अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी असते. रस्त्याच्या या अवस्थेमुळे पर्यटकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, बांधकाम विभागाने आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत दुरुस्ती झालेली नाही. नगराध्यक्ष शाम पांडे, उदय भोपे, नगरसेवक समीर भगत, भाऊ कुंभार, नगरसेविका अंकिता गोसावी, उमेश चव्हाण यांच्यासह खामगाव, कबाडवाडी परिसरातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. बांधकाम विभागाचे गौतम बांबळे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले.