जुन्या नोटांनी चुकविले 80 हजार कोटींचे कर्ज

0

नवी दिल्ली । नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर बाद झालेल्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटांचा वापर करून तब्बल 80 हजार कोटी रूपयांचे कर्ज भरण्यात आल्याची माहिती प्राप्तीकर खात्याने आज जाहीर केली आहे. जे उत्पन्न दाखवायचे टाळले जात होते असे 3 ते 4 लाख कोटी रुपये बँक खात्यात जमा झाले तसेच 8 नोव्हेंबरनंतर 60 लाख बँक खात्यांमध्ये प्रत्येकी 2 लाखापेक्षा जास्त रक्कम जमा झाली. नोटाबंदीनंतर सहकारी बँकांमध्ये 16 हजार कोटी रुपये जमा झाले. सहकारी बँकांमध्ये जमा झालेल्या 16 हजार कोटी रुपयांची आयकर खाते आणि ईडीकडून छाननी सुरु आहे. दरम्यान, प्राप्तीकर खात्याच्या आकडेवारीनुसार, सहकारी बँकांमध्ये 16 हजार कोटी रुपये भरण्यात आले आहेत. सुमारे 25 हजार कोटी आतापर्यंत निष्क्रिय असलेल्या बँक खात्यांमध्ये भरण्यात आले आहेत. हिंसाचारग्रस्त ईशान्येकडील राज्यांमध्ये विविध बँक खात्यांमध्ये 10 हजार 700 कोटींची रोकड जमा करण्यात आली आहे. यातील संशयास्पद डिपॉझिट्सची ईडी आणि प्राप्तीकर खात्यामार्फत चौकशी होणार आहे.

निर्णयकेंद्र सरकारचाच !
दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयाची केंद्र सरकारने आपल्याला फक्त एक दिवस आधी कल्पना दिल्याचे आरबीआयनं सांगितलं आहे. यामुळे हा निर्णय रिझर्व्ह बँकेने नव्हे तर केंद्र सरकारने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने सविस्तर माहिती दिली आहे. यानुसार अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या 3 समस्यांना लगाम घालण्यासाठी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घालण्याचा सरकारनं प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावात बनावट नोटा, दहशतवाद्यांना मिळणारा निधी, काळा पैशाचा उल्लेख आहे, असं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या बोर्डानं या प्रस्तावाचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तो सरकारकडे आला आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिली आणि जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली, असं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय आरबीआयनं नव्हे, तर सरकारनेच घेतल्याचे आता समोर आले आहे.

मोदीबाबू प्लॅस्टिक मनीचे विक्रेते! : बॅनर्जी
तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा नोटाबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर हल्लाबोल करत मोदीबाबू हे प्लॅस्टिक मनीचे विक्रेते बनले आहेत. मात्र, लोक प्लॅस्टिक खाणार का?, असा सवाल उपस्थित करत जोरदार टीकात्र सोडले आहे. ममता बॅनर्जी सध्या मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींविरोधात आता अरुण जेटली, लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथ सिंह यांचा आधार घेतला होता. देशाला वाचवण्यासाठी राष्ट्रहिताचे सरकार स्थापन करण्याची गरज असून या सरकारचे नेतृत्व अडवाणी, जेटली किंवा राजनाथ सिंह या तिघांपैकी एकाने केले पाहिजे. पण कोणत्याही परिस्थितीत मोदींनी पायउतार व्हावे अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती.

नोटीसा बजावणार
प्राप्तीकर खात्याने संशयास्पद अकाऊंटची माहिती जमा करण्याची जबाबदारी एका वरिष्ठ अधिकार्‍याकडे दिली आहे. कर चुकविला गेला असण्याची शक्यता असलेल्या देशभरातील खातेधारकांना नोटिसा बजाविण्याची मुख्य जबाबदारी या अधिकार्‍याकडे सोपविण्यात आली आहे. आमच्याकडे आता प्रचंड माहिती उपलब्ध झाली आहे. या माहितीच्या विश्‍लेषणामधून नोटाबंदीनंतर 60 लाखपेक्षाही जास्त खात्यांमध्ये दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरली गेल्याचे निदर्शनास आले आहे. या खात्यांमध्ये 7.34 लाख कोटींपेक्षाही जास्त रक्कम जमा झाली आहे,” असे या अधिकार्‍याने सांगितले आहे.