एरंडोल । येथील पोलीस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीमध्ये अनेक वर्षांपासून कर्मचार्यांचा रहिवास नसल्यामुळे तेथील घरांचे अस्तित्वच संपुष्टात आले असून बेवारस स्थितीत असलेल्या वसाहतीचा वापर काही नागरिकांकडून शेणखत जमा करण्यासाठी तसेच उकीरडा म्हणुन केला जात आहे. या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे निवृत्त पोलीस कर्मचार्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस स्थानकाच्या मागील बाजुस सुमारे पंधरा वर्षापूर्वी पोलिसांसाठी निवासस्थाने होती. सुमारे 17 पोलीस कर्मचारी या वसाहतीत आपल्या परिवारासह राहत होते. त्यानंतर पोलिसांची संख्या वाढल्यामुळे धरणगाव रस्त्यावर पोलिसांसाठी नवीन वसाहत बांधण्यात आली. नवीन वसाहतीत पोलीस कर्मचारी रहायला गेल्यामुळे जुन्या वसाहतीकडे दुर्लक्ष झाले असून या परिसराचा वापर नागरिकांकडून खाजगी कामासाठी केला जात आहे.
मोकाट कुत्री व डुकरांचा संचार वाढला
सद्यस्थितीत जुन्या पोलीस वसाहतीचा वापर शेणखत जमा करण्यासाठी केला जात असून याठिकाणी डुकरांचा व मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला आहे. या वसाहती जवळच उपधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालय असून देखील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या वसाहतीत पूर्वी 15 पोलीस कर्मचारी राहत होते. सध्या जुन्या वसाहतीची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून घरांचे दरवाजे, खिडक्यांसह अन्य साहित्याची चोरी झाली आहे. याठिकाणी निवास केलेल्या अनेक कर्माचर्यांची बदली झाली असून अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. काही कर्मचारी कामानिमित्त परिवारासह शहरात आले असता त्यांनी याठिकाणी भेट देवून आपण या वसाहतीत राहत होतो असे सांगून जुन्या आठवणीना उजाळा देवून वसाहतीच्या दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त केली. सद्यस्थितीत निवासस्थानांची कौले तुटली असून याठिकाणी अनेकांनी अतिक्रमण केले आहे. या वसाहतीत निवास केलेले निवृत्त पोलीस कर्मचारी या वासाहतिकडे पाहून जुन्या आठवणींना उजाळा देवून वसाहतीच्या अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. या वसाहतीच्या जागेची मालकी पोलीस खात्याकडे आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे याची पूर्ण माहिती मिळू शकली नाही.
लक्ष दिल्यास होणार उदयान
संबंधित विभागाने वसाहतीच्या जागेकडे प्रामाणिकपणे लक्ष दिल्या याठिकाणी सुंदर असे सार्वजनिक उद्यान होऊ शकते. गावाच्या मध्यभागी सदरची जागा असल्यामुळे या परिसराचा विकास केल्यास शहराच्या सौंदर्यांत भर पडू शकते. याबाबत संबधित विभागाने त्वरित दखल घेवून जुन्या पोलीस वसाहतीकडे लक्ष देवून याठिकाणी असलेला शेणाचा उकीरडा त्वरित हटवावा. तसेच परिसरात स्वच्छता करावी अशी मागणी निवृत्त पोलीस कर्मचार्यांनी केली आहे.