जुन्या भांडणाच्या वादातून अल्पवयीन मुलाचा खून

0

तळेगाव :- येथिल माळवाडी येथे हॉटेल ऐश्‍वर्याजवळ एका सतरा वर्षीय मुलाचा पाठलाग करून खून झाला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. जुन्या भांडणाच्या वादातून खून केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.रोशन उर्फ मट्या हिंगे (वय 17, रा. इंदुरी, ता. मावळ, पुणे) असे पाठलाग करून खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

धारधार शस्त्राने वार
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पासलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोशन हिंगे सकाळी साडेआठच्या सुरमारास तळेगाव इंदुरी रस्त्यावरून दुचाकीने जात होता. त्याच्यासोबत अन्य एक मुलगा होता. त्यांची दुचाकी माळवाडी येथे हॉटेल ऐश्‍वर्याजवळ आली असता, एका चारचाकी गाडीने रोशन हिंगे याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये रोशन हिंगे व त्याचा मित्र खाली पडले. चारचाकी गाडीतून आलेले हल्लेखोर उतरले. त्यांना पाहून रोशन व त्याच्या मित्राने पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी रोशन चा पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यावेळी त्याचा मित्र घाबरून पळून गेला. धारदार शस्त्राने वार केल्याने रोशन गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

रोशन बालगुन्हेगार
रोशन हा बालगुन्हेगार असून त्याच्यावर जुन्या भांडणाच्या वादातून हल्ला करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींची नावे अद्याप निष्पन्न झालेली नसून त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगूळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पासलकर आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी भेट दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.