रस्त्याचे ऑडीट करून ठेकेदारावर कारवाईची मागणी
पिंपरी चिंचवड : चिंचवड, आनंदनगर येथे एक महिन्यापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. सदर डांबरीकरण झाल्यानंतर सर्व रस्त्यांना मोठ मोठे खड्डे पडले आहेत. संबंधीत ठेकेदाराने प्रचलीत नियमानुसार शेड्युल बी नुसार काम न करता जुन्या रस्त्याला फक्त डांबराचा रंग, मुलामा मारला असून महापालिका आणि नागरिकांची फसवणुक केली आहे. यासंदर्भात रस्त्याच्या कामाचे ऑडीट होवून संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी ज्ञानेश्वर सिद्राम इटकल,( रा. आनंदनगर, चिंचवड स्टे. पुणे, 19) यांनी केली आहे. यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, शहर अभियंता (पिं.चिं.मनपा.), कार्यकारी अभियंता, (पिं.चिं.मनपा.) यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
महिनाभरातच उखडले रस्ते…
निवेदनात म्हटले आहे की, सदर रस्त्यावर ठेकेदाराने डांबर टाकून त्यावर कच म्हणजे दगडाचा चुरा टाकला. त्यावर रोडरोलर फिरविण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होवून महिन्यातच सर्व रस्ते उखडले आहेत. संबंधीत ठेकेदाराने जुन्या रस्त्यावरच फक्त डांबराचा मुलामा देवून महापालिका आणि नागरिकांची दिशाभूल केली आहे. तसेच महापालिकेच्या संबंधीत विभागातील अधिकार्यांनी ठेकेदाराला मदत केल्याचा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराची सर्व बिले त्वरीत थांबविण्यात यावी. तसेच, रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराच्या प्रत्येक कामाचे ऑडीट व्हावे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी व्हावी, असेही इटकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.