जुन्या वादातून झाला तलवार हल्ला

0

भुसावळ। डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूकित झालेल्या वादाचे रुपांतर 15 रोजी हाणामारीत होवून दोन गटात तुफान हाणामारी होवून तलवार व रॉडचा वापर करण्यात आला. यात नऊ जण जखमी असून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. दरम्यान संबंधित घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल होत नसल्याचे पाहून राहुल नगर परिसरातील महिलांनी शहर पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या मारुन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

जयंती मिरवणूकीत 14 रोजी रात्री झालेल्या वादातुन एका गटाकडून दुसर्‍या गटाविरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तर दुसर्‍या गटाची तक्रार दाखल झालेली नव्हती. 15 रोजी दुपारी राहूल नगर येथे झालेल्या हाणामारीत सागर सुभाष इंगळे (वय 26), सुभाष संभाजी इंगळे (वय 55), भरत सुभाष इंगळे (वय 25), प्रमोद भिका नरवाडे (वय 25), प्रितम इंगळे (वय 22) यांच्यावर हल्ला होवून जखमी झाले आहेत. यात सागरची प्रकृती गंभीर आहे.

महिलेची छेड काढल्यावरुन झाला वाद
दुसर्‍या गटात सागर कांतीलाल गाढे (वय 25), शंकर उत्तम रणधीरे (वय 30), संतोष अंबादास ठाकरे (वय 23), राहुल कांतीलाल गाडे (वय 25) हे जखमी आहे. यात शंकरला जबर दुखापत आहे. सागर इंगळेच्या आईशी संवाद साधला असता त्याला एकटे पाहून दुसर्‍या गटाने त्याच्यावर हल्ला केला. त्याला वाचविण्यासाठी अन्य लोक गेले असता त्यांच्यावर सुध्दा हल्ला करण्यात आला. तर दुसर्‍या गटाशी झालेल्या संवादानुसार आमच्या महिलेची छेड काढण्यात आली होती. म्हणून वाद निर्माण झाला होता.

उशिरा-पर्यंत नोंद नव्हती
याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आम्ही तक्रार दाखल केली म्हणून त्यांनी घरी येवून तलवारीने मारहाण केली. तसेच दांड्याने केलेल्या मारहाणीत उत्तम रणधीरे हे जखमी झाले असून भुसावळात खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच उत्तम रणधीरे यांच्या मुलीला मारहाण करण्यात आली असून ती घरी आहे. असे सांगण्यात आले. याबाबत पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.दोन्ही कडच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.