जुन्या वादातून भोसरीमध्ये तरुणावर गोळीबार

0

पिंपरी-चिंचवड : जुन्या वादातून एका तरुणावर गोळी झाडल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. भोसरीगावातील फुगे माने आळीत ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी तरुणाने आपल्या जबानीत ज्या तरुणावर गोळीबाराचा संशय घेतला तो तरुण स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. तथापि हा हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. गोळीबारात पंकज फुगे (वय 25, रा. भोसरी गावठाण ) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या पाठीला गोळी चाटून गेली आहे. त्याने आपल्या जबानीत अजिंक्य माने याने आपल्यावर गोळी झाडल्याचे सांगितले आहे.

हल्लेखोर अजिंक्य माने?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज फुगे व अजिंक्य माने यांचा आज सकाळी सिटी मॉल येथे भांडणे झाली होती. त्याचाच राग मनात धरून अजिंक्य माने त्याच्या साथीदारांना घेऊन भोसरीच्या फुगे माने आळीत आला. याठिकाणी त्याने तेथे पंकजशी वाद घालण्यास सुरुवात केली. पंकज याने तेथून पळण्यास सुरुवात असता पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. यामध्ये पंकजच्या पाठीला गोळी चाटून गेली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोळीबार नेमका केला कोणी?
घटनेनंतर अजिंक्य माने स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. तथापि हा गोळीबार नेमका कुणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक रिकामी पुंगळी व स्प्लेंडर गाडी जप्त केली आहे. पंकज फुगेवर भोसरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. गणपती उत्सवापासूनच त्यांच्यात वाद असल्याचेही बोलले जात आहे त्यामुळे हा गोळीबार का झाला व कोणी केला याचा भोसरी पोलीस तपास करत आहेत.