नाशिक । ज्यांच्या राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या होतात, ते सरकार काय कामाचे? असा प्रश्न विचारत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली आहे. गेल्या तीन वर्षात साडेचार हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्यांना कर्जमुक्ती का दिली जात नाही? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शेतकर्यांच्या कर्जमुक्तीवरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यातला लढा महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. त्याचेच संकेत संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये दिले आहेत. शिवसेनेच्या संपर्क अभियानात ते बोलत होते.
आरेला कारे म्हटलेच पाहिजे
आपली लढाई आपल्या मित्रपक्षासोबत आहे. पण आरेला कारे म्हटलेच पाहिजे असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. भाजप, शिवसेनेला संपवण्यासाठी चाली खेळते आहे, मात्र तसे होणार नाही. जुलै महिन्यात आपल्या अस्तित्त्वासाठी आपण सर्वात मोठी लढाई लढणार आहोत. असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच समृद्धी महामार्गावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. समृद्धी महामार्गासाठी शेतकर्यांच्या जमिनी अक्षरशः ओरबाडल्या जात आहेत. मात्र समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही हा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.
परिक्षेत तुम्ही ‘ढ’ ठरला
शेतकर्यांच्या पाठीशी शिवसेना उभी आहे, याची मुख्यमंत्र्यांना अडचण होतेय का? शेतकर्यांचे प्रश्न एकतर तुम्ही सोडवा, अथवा आम्हाला तरी सोडवू द्या. जनतेच्या परिक्षेत तुम्ही ढ ठरला आहात.
संजय राऊत, शिवसेना नेते
सरसकट कर्जमुक्ती हवी आहे
शिवसेनेला कर्जमाफी नकोय तर सरसकट कर्जमुक्ती हवी आहे त्यामुळे शिवसेना शेतकर्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार आहे असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसंदर्भात जी उच्चाधिकार समिती नेमली आहे त्यात दिवाकर रावते सहभागी होणार आहेत. या बैठकीत सहभागी होऊन ते शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडणार आहेत असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. जुलै महिन्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात शिवसेनेचे मोठे आंदोलन होणार आहे. समृद्धी महामार्ग होणार नाही ही उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पदाधिकार्यांनाही संजय राऊत यांनी झापले
आम्ही लढायचे आणि श्रेय इतरांनी घ्यायचे अशी सध्याची परिस्थिती आहे. आपण प्रसिद्धीत कमी पडतो आहोत. तसे चालणार नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नाशिकच्या शिवसेना पदाधिकार्यांनाही संजय राऊत यांनी झापले आहे. नाशिकमध्ये झालेल्या शेतकर्यांच्या आंदोलनात शिवसेनेचे किती पदाधिकारी होते? तुम्ही पदाधिकारी म्हणून मिरवता आहात का? या प्रश्नाचे उत्तरही उद्धव ठाकरेंना द्यायची तयारी ठेवा असेही संजय राऊत सेना पदाधिकार्यांना खडसावून सांगितले आहे. एकंदरीतच स्थिती पाहता येत्या काळात शिवसेना आणि भाजप यांच्यात, शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून वादाचे नवे नाट्य बघायला मिळणार आहे.