मुंबई : जूनपर्यंत मुंबईत स्वाईन फ्ल्यूने 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात स्वाईन फ्लूमुळे 5 जण दगावले आहेत. स्वाईन फ्लूप्रमाणेच लेप्टोस्पायरोसिसने जुलै महिन्यात लेप्टोने 3 जणांचा मृत्यू झाला. जीटीबी नगर येथील एका 40 वर्षीय महिलेला लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला. पाण्यातून लेप्टोची लागण झाल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 1 ते 26 जुलै या कालावधीत मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे तब्बल 538 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला. 538 पैकी 378 रुग्ण मुंबईमधील असून, 160 रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. जानेवारी 2017 पासून जुलै 2017 पर्यंत 3064 रुग्णांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. 16 ते 26 जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत डेंग्यूचे 269 रुग्ण आढळले आहेत. 1 ते 15 जुलैपर्यंत मलेरियाचे 309 रुग्ण होते, तर 16 ते 26 जुलै या कालावधीत मलेरियाचे 232 रुग्ण आढळले आहेत. 1 ते 15 जुलैपर्यंत गॅस्ट्रोचे 544 रुग्ण होते, तर 16 ते 26 जुलैपर्यंत गॅस्ट्रोचे 339 रुग्ण आढळले. 1 ते 15 जुलैपर्यंत हेपॅटायटिसचे 88 रुग्ण आढळले होते, तर 16 ते 26 जुलैपर्यंत 40 रुग्ण आढळले आहेत.