जुलैमध्ये होणार पीएचडीसाठी पेट परीक्षा

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) जुलै महिन्यात होणार असून या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून 8 जून पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यापीठाच्या संशोधन आणि विकास विभागाचे विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवडयात या परीक्षेची तारीख जाहिर केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची मूदत 30 जून आहे. 3 जुलै पर्यंत या ऑनलाईन अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह विद्यापीठात सादर करावयाची आहे. 8 जुलै रोजी या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या आणि परीक्षेतून सूट प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक यादी जाहीर केली जाणार आहे. 10 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात अथवा ई-मेलद्वारे आपले आक्षेप नोंदविता येणार आहे. अंतिम यादी 12 जुलै रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. 12 जुलै नंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होतील. प्रवेशपूर्व परीक्षेसाठी दोन पेपर राहणार असून पहिला पेपर हा सामान्य बुध्दीमत्ता चाचणीचा तर दुसरा पेपर संबंधित विषयाशी निगडित असेल. दोन्ही पेपर प्रत्येकी 100 गुणांचे असतील. या परीक्षेत सूट प्राप्त करु इच्छिणाज्या विद्यार्थ्याना देखील ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यासाठी परीक्षा शुल्क 1200 रुपये तर अनुसुचीत जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे.