जुहू चौपाटीच्या स्वच्छतेसाठी रहिवाशांच्या संमतीने कंत्राटदाराची नियुक्ती

0

मुंबई । वर्सोवा समुद्रकिनार्‍यावरील कचरा साफ करण्यासाठी अफरोझ शाहने घेतलेल्या पुढाकारामुळे महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाला अक्षरशः वादाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे जुहू चौपाटीच्या स्वच्छतेसंबंधी महापालिका यंत्रणा आता सावधगिरीची भूमिका घेत आहे. जुहू रहिवासी संघटनेच्या सूचना आणि मते जाणून घेतल्यावर जुहू चौपाटीच्या सफाईसाठी नव्या कंत्राटदाराची निवड करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे संमतीसाठी सादर केला जाणार आहे.

महापालिकेच्या एच-पश्‍चिम विभागातील चिंबई आणि वारिंगपाडा या समुद्रकिनार्‍यांवर रोज साठणार्‍या कचर्‍याची दैनंदिन सफाई करणार्‍या कंत्राटदाराच्या नियुक्तीची मुदत संपल्यामुळे पालिकेने नव्या कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने संमत केला आहे. या किनार्‍यांवर स्वच्छतेसाठी एकाही कंत्राटदाराची नियुक्ती केली नसल्याने भरतीच्यावेळी डेब्रिज, गाळ व मातीमिश्रित कचरा साठतो. त्याची विल्हेवाट क्षेपणभूमींवर लावण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेवक आणि रहिवाशांच्या सूचनांनुसार नवीन कंत्राटदार नियुक्त केला आहे. या चौपाटीच्या स्वच्छतेसाठी ’जुहू रेसिडेन्स असोसिएशन’ने पुढाकार घेत स्थानिकांकडून सूचना घेतल्या आहेत. त्या पालिकेकडे सादर करण्यात आल्या. पालिकेने विविध सूचनांचा विचार करून कंत्राटाच्या निविदा मागवल्या आहेत.

यांत्रिकी झाडूची अट शिथिल
यांत्रिक झाडूचा अधिकाधिक वापर करावा, चौपाटीची स्वच्छता करताना कचरा ठरावीक पाळीतच उचलावा ही अट काढून एका पाळीत जेवढा कचरा संकलन होईल तेवढा ठेकेदाराला उचलावाच लागणार आहे. कधी कमी तर कधी जास्त कचरा जमल्यास तो कंत्राटदाराला उचलणे आणि चौपाटीचा परिसर स्वच्छ ठेवणे त्याला बंधनकारक असणार आहे, अशी माहिती सिंघल यांनी दिली. यासंबंधी त्याला कायदेशीर आव्हान देता येणार नाही.