जूनच्या तिमाहीत डीएसकेला 1.53 कोटींचा तोटा!

0

पुणे : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारा बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य उद्योगसमूह डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सला सद्या वाईट दिवस आले आहेत. जून 2017 च्या तिमाहीत डीएसके डेव्हलपर्सला 1.53 कोटी रुपयांचा थेट तोटा झाल्याचे वृत्त बिझनेस स्टॅण्डर्ड या ऑनलाईन वेबपोर्टलने दिले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. गतवर्षी याच तिमाहीत डीएसकेला 2.13 कोटींचा नफा झाला होता. त्यात घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, पैसे परत न केल्याने गुंतवणूकदारांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरल्याने डीएसकेच्या अडचणी वाढल्या आहेत.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार
मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरे देणारे व्यावसायिक म्हणून डीएसके ओळखले जातात. तथापि, गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. डीएसकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने हे गुंतवणूकदार त्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारत असताना, आता त्यांनी शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना डी. एस. कुलकर्णी यांनी जानेवारी 2018 पर्यंत सर्व गुंतवणूकदारांची देणी देण्यात येईल, असा दावा केला आहे. विविध ठिकाणच्या जमिनी आणि विदेशी गुंतवणूकदारांशी व्यवहाराची बोलणी अंतिम टप्प्यात असून, या व्यवहारातून 485 कोटी रुपये उभारण्यात येतील, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. जानेवारी 2018 पर्यंत सर्व आर्थिक प्रश्न संपुष्टात आलेली असतील, असेही डीएसके यांनी ठोसपणे सांगितले होते.

डीएसकेंसमोरील अडचणीत वाढ!
बिजनेस स्टॅण्डर्ड या इंग्रजी ऑनलाईन संकेतस्थळाने डीएसके डेव्हलपर्सला जून 2017च्या तिमाहीत 1.53 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे वृत्त दिले आहे. गतवर्षी याच तिमाहीत डीएसकेला 2.13 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तसेच, सद्या डीएसकेची विक्रीही मंदावली असून, विक्रीत 74.21 टक्क्यांनी घसरण झाली असून, ती जूनच्या तिमाहीत 6.36 कोटी रुपये इतकी होती, असेही या वृत्तात नमूद आहे. गतवर्षी याच तिमाहीत डीएसकेची विक्री तब्बल 24.66 कोटी इतकी होती, असेही नमूद करण्यात आलेले आहे. मध्यमवर्गीय पुणेकरांनी डीएसकेकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून, सद्या हे गुंतवणूकदार आपले पैसे परत मागत आहेत. तर पैसे देण्यात डीएसकेला अडचणी येत आहेत. त्यामुळे जूनच्या तिमाहीत झालेला तोटा पाहाता, डीएसकेंसमोरील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.