जॅकी पथरोडचा भोपाळ शहरात निर्घूण खून

0

भुसावळ । भुसावळातील प्रसिद्ध मल्ल तथा माजी नगरसेवक मोहन मुनीर बारसे (मोहन पहेलवान, वय 66) यांच्या खुनातील संशयीत आरोपी जॅकी पथरोडचा भोपाळमधील एमपी नगरातील रचना नगर अंडरब्रिजजवळ चाकूचे निर्घूण वार करून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री 12.20 वाजता घडली. या प्रकरणी भोपाळमधील सुरेश अग्रवाल नामक संशयीतास अटक करण्यात आली आहे. मयताने आरोपीकडून दुचाकी घेतली होती व त्यापोटी सहा हजार रुपये न दिल्याने उभयंतांमध्ये वाद सुरू होता व त्यातूनच ही हत्या झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एमपीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सहा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल तसेच बाजारपेठ पोलिसांना भोपाळ पोलिसांनी याबाबत सूचित केल्यानंतर पोलिसांनी शहरातील जामनेर रोडवरील वाल्मीक नगरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे शिवाय शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.

चाकूचे सपासप वार झाल्याने जॅकी पथरोडचा मृत्यू
भोपाळमधील एमपीनगरचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांच्या माहितीनुसार भुसावळातील जगदीश उर्फ जॅकी पथरोड (40) हा रचना नगरात भाड्याच्या घरात पत्नी जयासह राहत होता. उभय दाम्पत्य नातेवाईकांकडून जेवण आटोपून मंगळवारी रात्री 12.20 वाजता दुचाकीने घराकडे परतत असताना प्रेस कॉम्प्लेक्स, रचना नगर अंडरब्रिजजवळ पोहोचल्यानंतर एका युवकाने पथरोडच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्याने जॅकी जमिनीवर पडताच संशयीत आरोपीने गळ्यावर तसेच मानेवर चाकूने सपासप वार केल्याने जागेवरच जॅकीचा करुण अंत झाला. खुनानंतर सीएसपी कुलवंत सिंह व एसपी साउथ सिदार्थ बहुगुणा यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून मिरची पावडरची पूड जप्त करण्यात आली.

आईशी बोलणे ठरले अखेरचे
भोपाळ नगर निगममध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून कामास असलेला जॅकी मंगळवारी रात्री भुसावळात रक्षाबंधनासाठी येणार होता. आई सुशीला यांच्याशी त्याची मंगळवारी सायंकाळी दिवसभरात बोलणेही झाले तसेच सायंकाळी साडेसहा वाजता स्वतः जॅकी याने आपण रात्रीच्या गाडीने भुसावळात येणार असल्याची माहिती कुटुंबियांना दिल्याने कुटुंबिय आनंदले होते. मात्र भुसावळात येण्यापूर्वीच त्याचा घात झाला. आईशी आपण आज शेवटचे बोलत आहोत, अशी साधी पुसटशी कल्पनादेखील त्याला आली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार संशयीत आरोपीच्या हातात लहान व मोठा असे दोन चाकू होते व अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मयत पथरोडला हालचालदेखील करण्यास वेळ मिळाला नाही. खुनानंतर आरोपी रचनानगरकडे पायीच पसार झाला मात्र पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्यास अटक केली.

3 जुलै 2015 रोजी शहरातील जामनेर रोडवरील वाल्मीक नगराजवळील रीक्षा स्टॉपजवळ मोहन बारसे यांच्यावर सहा संशयीत आरोपींनी हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता संशयीत आरोपी म्हणून माजी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी, नट्टु चावरिया, गोपाळ शिंदे, बंटी पथरोड, विजय पथरोड, जॅकी पथरोड यांच्याविरुध्द बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल होता.

जॅकीविरुद्ध पोलिसांमध्ये तीन गुन्हे
मयत जॅकीविरुद्ध शहर पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल होता मात्र या गुन्ह्यात तो निर्दोष सुटला होता तर भुसावळ पालिकेत 2006 मध्ये उसळलेल्या दंगलीप्रकरणी त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल होते शिवाय 2015 मध्ये मोहन बारसे खुनातही तो संशयीत आरोपी असल्याने न्यायालयाने त्यास या गुन्ह्यात जिल्हाबंदी केली होती तर नंतर अट शिथील करीत कामकाजानिमित्त शहरात येण्यास परवानगी दिली होती शिवाय बाजारपेठ पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेशही दिले होते. चौघा जणांनी आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप मयत पथरोड यांच्या कुटुंबियांनी केला आहे. संशयीत मात्र कोण होते याची आम्हाला माहिती नाही, असेही कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

गुरूवारी होणार अंत्यविधी
भुसावळातील वाल्मीक नगरातील मयत जॅकीचा मोठा भाऊ किसन इंदल पथरोड व आप्तेष्ट मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बुधवारी भोपाळकडे रवाना झाले. एमपीनगर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला असून आरोपी सुरेश अग्रवालविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय कल्याणसिंग रघुवंशी करीत आहेत. मयत जॅकीच्या मृतदेहावर गुरूवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. मयताच्या पश्‍चात पत्नी, आई सुशीला, बहिणी सीता व दुर्गा तसेच मोठा भाऊ किसन असा परिवार आहे.