जेएनपीटी बंदरातील आरटीजीसी क्रेन जळाले

0

उरण । उरणच्या जेएनपीटी बंदरातील एका आरटीजीसी क्रेनला शुक्रवारी भीषण आग लागल्याने ती जळून खाक झाली आहे. रबर टायर ग्रेटी क्रेन म्हणून परिचित असलेल्या या क्रेनच्या जळण्याने बंदराचे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. परदेशातून आयात कराव्या लागणार्‍या अशा एका क्रेनची किंमत सुमारे 30 कोटींपासून साथ ते 70 कोटीपर्यंत असू शकते अशी माहिती बंदरातीलच एका अधिकारी व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर याम्च्याशी संपर्क साधला असता त्यांनी शॉर्टसर्किटमुळे आरटीजीसी क्रेन चालवणार्‍या इलेक्टिकल इंजिनाला आग लागली असून हा एक केवळ अपघात असल्याचे बोलताना सांगितले. मात्र यातून नुकसान किती झाले याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याचे उघड
उरणच्या जेएनपीटी बंदरात देश-विदेशातून कंटेनर भरून येणार्‍या जहाजातून कंटेनर उतरवणे. परदेशात निर्यात करावयाचे कंटेनर संबंधित क्रेनमध्ये चढविणे, अशी अतिशय महत्त्वाची कामे लीलया करणारी बंदराच्या स्वमालकीची आरटीजीसी क्रेन जाळून खाक झाली आहे. बंदर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार क्रेन नव्हे, तर क्रेनला चालविणारे इंजिन जळाले आहे. सुमारे तासाभराच्या अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. बंदरात जागोजागी सेफ्टी फ्रस्ट असे फलक लागलेले असताना आरटीजीसी क्रेनसारख्या महत्त्वाच्या बाबीकडेदेखील ऑपरेशन विभागाच्या अधिकारी वर्गाचे फारसे लक्ष नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.