उरण (अजित पाटील) : चिपळूणच्या रक्तचंदन प्रकरणात अटक केलेल्या इसा जमालुद्दीन हळदे यांच्या अटकेनंतर उरणचे जेएनपीटी बंदर आणि रक्तचंदन तस्करी यांचे नाते पुन्हा एकदा पुढे आले आहे. या बंदरातून वरचेवर सातत्याने होणार्या रक्तचंदन तस्करी मध्ये स्थानिकांचा सहभाग असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. एका प्रकरणात तर कस्टमने कस्टडीत घेतलेल्या रक्तचंदनावरही काही चोरांनी डल्ला मारला होता त्यात काही स्थानिकांनाही पोलिसी खाक्याचा प्रसाद मिळाला होता तर दुसर्या एका प्रकरणातील रक्तचंदन तस्करीतील आरोपीना नेरूळच्या एका हॉटेलात भेटून वाटाघाटी केल्याप्रकरणी एका पोलीस निरीक्षकाला ही चौकशीच्या फेर्यातून जावे लागले होते. या सर्व पार्श्वभूमीवर चिपळूणच्या रक्तचंदन प्रकरणात इसा जमालुद्दीन हळदे याला अटक झाल्यानंतर पुन्हा एकदा जेएनपीटी मार्गानेच हे रक्तचंदन परदेशात पाठविले जाणार असल्याचे समोर आले असल्याने आता पुन्हा एकदा जेएनपीटी बंदर रक्तचंदन तस्करीचा अड्डा झालाय का असा सवाल समोर आला आहे.
विशेष म्हणजे जेएनपीटी बंदराच्या स्थापनेपासून आजतागायत बंदरातून शेकडो वेळा रक्तचंदनाची तस्करी झाल्याची प्रकरने समोर आली मात्र त्यापैकी कोणत्याही प्रकरणात तपास यंत्रणा कधीही रक्तचंदन वाहून आणलेल्या कंटेनर ट्रेलरच्या ड्रॅयव्हर, क्लिनर, किंवा कस्टम क्लियरींग एजंट याच्यापेक्षा पुढे जाऊन कधीही रक्तचंदनाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचली नाही. अशा तस्करीतील स्थानिकांच्या सहभागाबाबतही ठोस पुरावे मिळवू शकलेली नसल्याने रक्तचंदन तस्करीमागचा तपास म्हणजे ङ्गआम्ही मारल्या सारखे करू तुम्ही रडल्या सारखे करा ’ असाच होतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आखती देशात मोठी मागणी
महाराष्ट्रात मिळत नसलेल्या रक्तचंदनाची तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांमधून तस्करी होते. या रक्तचंदनाला दुबई, सारख्या अरब राष्ट्रात मोठी मागणी आहे. दक्षिण भारतातून रक्तचंदन आणून ते पुढे समुद्रमार्गे परदेशात पाठवले जाते.
अनेक मुद्दे अनुत्तरीतच
विशेष म्हणजे चिपळूणच्या प्रकरणात जसा वनविभागाने पुढाकार दाखवला तसा पुढाकार उरण सारख्या ठिकाणी वनविभागाने कधीच दाखवला नाही उलट पनवेलच्या एका घटनेत संशयाची सुई वनविभागातीलच काही कर्मचारी वर्गाला टोचली गेल्याचे प्रकरणही उरण – पनवेलकर जनतेने अनुभवले आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा जे एन पी टी बंदर आणि रक्तचंदन तस्करी हे नातं सामान्यांच्या विश्वातही चर्चेला आले आहे. अनेक मुद्दे या निमित्ताने गेली वर्षानुवर्षे अनुत्तरीतच राहिले आहेत.
आजतागायत दोनच स्कॅनिंग मशीन
विशेष म्हणजे जेएनपीटी बंदराचा कारभार सुरू झाला त्या वेळेपासून बंदराचा कंटेनर हाताळणीचा वेग किमान पाचशे पटीने वाढलेला असताना कंटेनर स्कॅनिंग मशीन मात्र सुरुवातीच्या काळापासून आजतागायत दोनच आहेत. त्यात वाढ करण्याची शिफारस कस्टम विभागाने यापूर्वी अनेकदा केंद्राला केली मात्र कंटेनर स्कॅनिंग मशीन वाढवण्यात ना कोणत्याच सरकारला रस आहे ना दिल्लीत बसलेल्या अधिकारी वर्गाला विशेष म्हणजे आजच्या बंदराच्या आवाढव्य व्यापाचा विचार करता एकूण कंटेनरच्या 30 टक्केही कंटेनर स्क्यानिग करणे शक्य नाही त्यामुळे एखाद्या कंटेनर बाबत ड्युटीवर असलेल्या कस्टमच्या अधिकारी वर्गाला संशय आला तरच अशा कंटेनरची तपासणी होते त्यामुळे स्क्यानीग न होता पाठविल्या जाणार्या सत्तर टक्के कंटेनर पैकी काहींमधून रक्तचंदनाची तस्करी कशावरून होत नसेल हा सवाल देखील वर्षानुवर्षे अनुत्तरीतच राहिला आहे.