उरण (अजित पाटील): जेएनपीटीबंदराने परदेशातून मागविलेल्या सहा अत्याधुनिक आर टी जी सी क्रेन्स नुकत्याच बंदरात दाखल झाल्या आहेत. या नव्या क्रेन्स च्य माध्यमातून बंदराचे कामकाज अधिक कार्यक्षम आणि वेगवान होईल असा आशावाद बंदराचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी व्यक्त केला आहे . परदेशातील मेसर्स सन्नी ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड यांचे कडून जेएनपीटी बंदराने 15 नव्या क्रेन्स मागवल्या आहेत त्यापैकी सहा क्रेन्स आज बंदरात दाखल झाल्या असून या नव्या क्रेन्स च्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती बंदराच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.
जुन्या क्रेन्स बदलण्यात येणार
ज्यावेळी सर्वांच्या सर्व नव्या क्रेन्स उपलब्ध होतील त्यावेळी जुन्या क्रेन्स बदलण्यात येणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले आहे. जागतिक कीर्तीच्या जेएनपीटीबंदराने देखील आधुनिकतेची झालर पांघरायला सुरुवात केली आहे. या निमित्ताने बंदराने आपल्याकडील जुन्या क्रेन्स बदली करून नव्या घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे त्यानुसार परदेशातील मेसर्स सन्नी ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड यांचे कडून वीजेवर चालणार्या 15 नव्या आरटीजीसी क्रेन्स मागविल्या आहेत. त्यापैकी पहिल्या 6 क्रेन्सचा पहिला लॉट नुकताच बंदरात दाखल झाला असून या नव्या क्रेन्सचे स्वागत बंदराचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर आणि उपाध्यक्ष नीरज बन्सल यांनी केले आहे.
बंदराची व्यवसाय वृद्धी वाढणार
या नव्या क्रेन्स च्या माध्यमातून बंदराची व्यवसाय वृद्धी अधिक पटीने वाढण्याबरोबरच बंदराच्या एकूण व्यवसाय वाढण्या बरोबरच वेळ आणि पैशाची ही बचत होणार आहे. बंदरात सध्या अस्तित्वात असलेल्या आरटीजीसी क्रेन्स या डिझेलवर चालणार्या आहेत त्या मानाने नव्या क्रेन्स विजेवर चालणार असल्याने अधिक कार्यक्षमतेने त्या चालणार असल्याचा विश्वास प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या नव्या क्रेन्स च्या माध्यमाने बंदराकडून अधिकाधिक जहाज हाताळणी आणि कंटेनर हाताळणी होणार आहे. त्याद्वारे नव्याने या ठिकाणी अप्रत्यक्ष रित्या ट्रॅक्टर र्टेलर ड्रायव्हर, सर्व्हेअर, शिंपिग एजंट आणि कस्टम हाऊस एजंट आदी प्रकारचा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याचे जे एन पी टी ने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.