जेएनयूतील हल्ला हा भाजपचा कट ; विरोधकांकडून आरोप !

0

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरु विद्यापीठात रात्री विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाला. यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान या हल्ल्यावरून देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. विरोधकांनी हा हल्ला भाजप आणि एबीव्हीपीप्रणीत असल्याचे आरोप केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गुंडांकडून हा हल्ला करण्यात आल्याचे आरोप होत आहे. दरम्यान भाजपने या घटनेचा निषेध करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी हा हल्ला कट होता असे आरोप केले आहे. कॉंग्रेसनेते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्ली पोलीस केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आदेशाप्रमाणे वागत असल्याचे आरोप केले आहे.

भाजप खासदार मनोज तिवारी यांनी काही राजकीय पक्षांकडून या घटनेला राजकीय रंग दिला जात असल्याचे आरोप करत चौकशीची मागणी केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील चौकशीची मागणी केली.

दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री काही चेहरे झाकलेल्या गुंडांनी विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विद्यार्थी कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील विद्यार्थी संघटना मध्यरात्रीपासूनच रस्त्यावर उतरल्या असून ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

त्याचबरोबर, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या हल्ल्याबाबत विद्यापीठाचे निबंधक प्रमोद कुमार यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे. देशभरातील बुद्धिवंत, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विरोधी पक्षांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हल्ल्यामागे केंद्रातील सत्ताधारी भाजपचा हात असल्याचा आरोप आप’सह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.