नवी दिल्ली : दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र कोर्टाने फेटाळून लावले आहे. याप्रकरणी कोर्टाने दिल्ली पोलिसांना चांगलेच फटकारले आहे. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही, असा सवाल कोर्टाने पोलिसांना केला. ‘राज्याच्या कायदा विभागाकडून परवानगी न घेता तुम्ही आरोपपत्र दाखल केलेच कसे?’ अशी विचारणा शहर दंडाधिकारी दीपक राजावत यांनी केली.
दिल्ली पोलिसांनी कन्हैयासह उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूत एका कार्यक्रमाचं आयोजन करून देशद्रोही स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आपली चूक मान्य करत ‘आप’ सरकारची परवानगी घेणार असल्याचं दंडाधिकाऱ्यांना सांगितलं. सोबतच यासाठी कोर्टाकडून १० दिवसांची मुदत मागून घेतली.