नवी दिल्ली: ५ जानेवारीला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हिंसाचार झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणावरून सध्या देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. हल्लेखोर हे भाजपप्रणीत संघटनेचे असल्याचे आरोप विरोधक करत असून जेएनयू विद्यार्थी संघटनाच या हल्ल्याचे सूत्रधार असल्याचे आरोप भाजप आणि भाजपप्रणीत संघटनेकडून होत आहे. दरम्यान हल्ल्याचा तपास सध्या दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेत आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी ओळख पटवलेली मुलगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभाविपच्या सचिवानेच याला दुजोरा दिला आहे.
कोमल शर्मा असे या युवतीचे नाव असल्याचे समोर आले आहे. मात्र या युवतीने आरोप फेटाळून लावले आहे. तिने महिला आयोगाकडे तक्रार देखील केली आहे. माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कोमल शर्मा यांनी महिला आयोगाला पत्राद्वारे कळविले आहे. कोमल शर्माच्या तक्रारीनंतर महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत पत्र दिले आहे.