जेजुरीतील दानपेटीचा पेच सुटला

0

जेजुरी । महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदीरातील पुजारी-गुरव, वीर, कोळी, घडशी समाजबांधव व श्री मार्तंड देवसंस्थान समिती या दोघांमध्ये मुख्य मंदिर दानपेटीतील उत्पन्नाच्या हिस्यांबाबतचा निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे. समस्त पुजारी सेवेकरी वर्ग व देवसंस्थान विश्‍वस्त तसेच दोन्हीकडील वकील यांच्यात आपापसातील समन्वयाने झालेल्या चर्चेतून दिवाणी दावा क्र.1650/96 मध्ये न्यायालयाने दिलेल्या हुकुमाप्रमाणे समस्त पुजारी, सेवेकरी यांना 50 टक्के व मार्तंड देवसंस्थानला 50 टक्के दानपेटीतील उत्पन्न वाटप करण्याचे ठरले, त्यानुसार देवसंस्थान व्यवस्थापनाने नोव्हेंबर 2017 ते 14 मे 2018 पर्यंतचे धनादेश पुजारी, सेवेकरी वर्गाला अदा केले आहेत.यावेळी प्रमुख विश्‍वस्त राजकुमार लोढा, विश्‍वस्त संदीप जगताप, पंकज निकुडे-पाटील, शिवराज झगडे, ऍड. अशोकराव संकपाळ, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई, विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई तसेच गुरव, वीर, कोळी, घडशी समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात वंश परंपरा, रितिरिवाजानुसार धार्मिक विधी, पूजा अर्चा आदी माध्यमातून आपली सेवा बजावत उदरनिर्वाह करणारे गुरव, वीर, कोळी, घडशी आणि मंदिर गडकोट आवाराचे व्यवस्थापन पाहणारे मार्तंड देवसंस्थान समिती यांच्यामध्ये मुख्य मंदिर दानपेटीतील उत्पन्न हिस्स्याबाबत गेली अनेक वर्षांपासून पेच होता. याबाबत न्यायालयात याचिका दाखल झाली होती. 50-50 टक्के विभागून घेण्याचा निर्णय 2015 मध्ये घेतला गेला; त्यानुसार नोव्हेंबर 2017 पासून गुरव, वीर, कोळी, घडशी या समाजबांधवांना त्यांच्या उत्पन्नाचा हिस्सा अदा करण्यात आला नव्हता, त्यातच नवीन विश्‍वस्त मंडळ अस्तित्वात आले. यामुळे समाजबांधवातील प्रमुख व्यक्ती त्यांचे वकील ऍड. वळसंगकर, देवसंस्थान विश्‍वस्त व त्यांचे वकील ऍड. बक्षी यांच्या समवेत चर्चा होऊन दिवाणी दावा क्र.1650/96 मधील न्यायालयाने दिलेल्या हुकुमाप्रमाणे दानपेटीतील 50-50 टक्के रक्कम घ्यायचे ठरले, त्यानुसार गेली सहा महिन्यांपासून पुजारी वर्गाचे थांबविण्यात आलेले उत्पन्नातील हिस्स्याचे धनादेश देवसंस्थानकडून शनिवारी (दि.19) अदा करण्यात आले आहेत.

पेच सुटल्याने समाधान
यावेळी सर्व विश्‍वस्तांसह पुजारी, सेवेकरीबांधव उपस्थित होते. पुजारी, सेवेकरी व देवसंस्थान समिती यांच्यामध्ये समन्वय व सलोखा राहावा, पुढील काळात भाविकांच्या धार्मिक विधीतील मागण्यावर विचार व्हावा, असे ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई यांनी सांगितले. पुजारी, सेवेकरी व देवसंस्थानमधील उत्पन्नाच्या हिस्याबाबतचा पेच सुटल्याचे समाधान झाल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रमुख विश्‍वस्त राजकुमार लोढा यांनी तर पंकज निकुडे पाटील यांनी आभार मानले.