जेजुरी गडाच्या दुरुस्तीसाठी आराखडा

0

जेजुरी : पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालकांनी नुकतीच जेजुरी गडकोट व मंदिराची पाहणी केली. खंडोबा गड व मंदिराच्या सर्वंकष जतन-दुरुस्तीसाठी वास्तुविशारद तज्ज्ञ नियुक्त करून आराखडा केला जाईल. पायरी मार्गावरील प्लॅस्टिक कागद व तावदाने काढून टाकाव्यात आदींसह अकरा सूचना देवसंस्थानला करण्यात आल्या आहेत.
खंडेरायाच्या गडकोट, मंदिर, आवार व पायरीमार्गावरील दीपमाळा वेशी यांच्या डागडुजी-दुरुस्तीची गरज या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे, वास्तू जतन सहायक रामेश्‍वर निपाणे यांनी जेजुरी येथे येऊन पायरीमार्ग, मंदिर, गडकोट आवार, दीपमाळा, वेशी, तटबंदी यांची पाहणी केली होती. त्या अनुषंगाने एका पत्राद्वारे देवसंस्थान समितीला त्यांनी सुमारे अकरा सूचना केल्या आहेत.

पायरीमार्ग व गडकोटाच्या बाजूला अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून दीपमाळा, वेशींना ताडपत्र्यांच्या प्लॅस्टिक कागदांच्या दोर्‍या बांधल्या आहेत. त्यामुळे हवा व पाणी यांच्या दबावाने दीपमाळा, वेशी, पुरातन वास्तूंना धोका निर्माण होत आहे. ते तत्काळ काढण्यात यावेत. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळला जातो. तो वेळच्यावेळी स्वच्छ करावा, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावेत, आदींसह सुमारे 11 सूचना करण्यात आल्या आहेत.

पुरातन वास्तूंना धोका

पायरीमार्ग व गडकोटाच्या बाजूला अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून दीपमाळा, वेशींना ताडपत्र्यांच्या प्लॅस्टिक कागदांच्या दोर्‍या बांधल्या आहेत. त्यामुळे हवा व पाणी यांच्या दबावाने दीपमाळा, वेशी, पुरातन वास्तूंना धोका निर्माण होत आहे. ते तत्काळ काढण्यात यावेत. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळला जातो. तो वेळच्यावेळी स्वच्छ करावा, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावेत, सुमारे 11 सूचना करण्यात आल्या आहेत.

दरड कोसळण्याची शक्यता

खंडोबा गडकोट मंदिर राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्तीबाबत वास्तुविशारद तज्ज्ञ नेमण्यात येऊन आराखडा तयार केला जाईल. संरचनात्मक परीक्षण अहवाल तयार करण्यात येईल. त्याचा खर्च देवसंस्थानने करायचा आहे. मागील काळात मंदिर परिसरात अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वास्तूचे नुकसान झाले आहे.
मंदिराच्या मुख्य गाभार्‍यामध्ये मार्बल लावण्यात आल्याने आतील भागात आर्द्रता वाढत आहे. त्यामुळे मूर्ती व मंदिराचे आयुष्यमान कमी होण्याची शक्यता आहे. मंदिराच्या तटबंदीतील ओवरी अनेक वर्षांपासून बंद करून कार्यालय, स्नानगृह, स्वयंपाकगृह खोल्या निर्माण केल्याने व यात वापरणारे पाणी भिंतीत मुरल्याने भिंत फुगलेली आहे. त्यामुळे काही दगड कोसळण्याची शक्यता पुरातत्त्व विभागाने वर्तवली आहे.

सरकार मान्यतेनंतर दुरुस्ती

मंदिर, गडकोट, दीपमाळा, पायरीमार्ग, नगारखाना, प्रवेशद्वार, विविध मंदिरे, कमानी, दगडी शिल्पे यांची पुरातत्त्वशास्त्र संकेतानुसार सर्वंकष जतन, दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी कामांचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. तत्पूर्वी विकासकामांचे ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्यात येईल. त्यापैकी काही निधी देवसंस्थान खर्च करेल, तर उर्वरित निधीची मागणी सरकारकडे करण्यात येईल. सरकार मान्यतेनंतर दुरुस्तीची कामे सुरू होतील, असे पत्राद्वारे देवसंस्थानला कळविण्यात आले आहे.