जेजुरी रेल्वे स्थानकवर साकारणार खंडोबा देवस्थानाची प्रतिकृती

0

सर्व सोयीसुविधांसाठी 2 कोटींचा खर्च : फलाटांचे होणार नूतनीकरण

पुणे : पुणे विभागांतर्गत येणार्‍या जेजुरी रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात जेजुरी गडाची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. पुणे-सातारा लोहमार्गावर जेजुरी स्थानक येत असून या स्थानकाचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे विभागातील जेजुरी स्थानक खंडोबा देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या या गडावर येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. यामुळे हे स्थानक आकर्षक असावे, यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वे स्थानकाची इमारत आणि दर्शनी भागाला आकर्षक रूप देण्यात येणार असून यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

वॉटर फिल्टर प्लँट

मे अखेरीस ही प्रतिकृती उभारण्याचे काम पूर्णत्वास येईल. दरम्यान, जेजुरी स्थानकावरील प्लॅटफॉर्म एकवर 24 कोचच्या गाड्या मावतील अशा पद्धतीने लांब करण्यात येणार असून त्याचे नूतनीकरण सध्या प्रगतीपथावर आहे. तसेच, नवे छत टाकण्याचे काम सुरू असून येत्या काही महिन्यांत प्रवाशांसाठी सर्व सुख-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. जून 2019 पर्यंत स्थानकात 1 वॉटर फिल्टर प्लँटदेखील बसविण्यात येणार असून या कामांसाठी एकूण 2 कोटी 25 लाखांचा खर्च अपेक्षित आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरमहा अडीच लाख भाविक

जेजुरी येथील देवस्थानला दरवर्षी सुमारे 25 लाख भाविक येतात. त्यात दर महिन्याला भाविकांची संख्या ही दोन ते अडीच लाख भाविक येतात. पौर्णिमा, उत्सव, लग्नकार्यानंतर देवदर्शनाची संख्या लक्षणीय आहे. जेजुरीचा खंडोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थानमधून भाविकांची संख्या मोठी आहे. मुंबई, पुणे शहराशी कनेक्ट असलेले हे रेल्वे स्थानक गेल्या 25 वर्षांत नावारूपाला आले आहे. कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांशी जोडणार्‍या या रेल्वे स्थानकात भाविकांना सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यात प्रशासन हा कायापालट करणार आहे. त्याचा रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत भर पडणार आहे.

स्थानकाचे रूप पालटणार

ब्रिटीशकालीन जेजुरी रेल्वे स्थानकात प्रशासनाकडून सुविधा देण्यावर भर दिला आहे. पुणे-कोल्हापूर ही रेल्वे सेवा सुरू होऊन 125 वर्षे झाली आहेत. पहिली रेल्वे 20 एप्रिल 1891 मध्ये धावली. त्यामुळे सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर या भागातील भाविक जेजुरीशी जोडले गेले. त्याचबरोबर केरळ, गोवा, कर्नाटक राज्यातील भाविकांना जेजुरीकडे येण्यासाठी सोयीची झाली. त्यामुळे दरदिवशी किमान सात ते दहा रेल्वे गाड्यांचा थांबा जेजुरीत असतो. तसेच प्रवाशांचे भारमान हे सर्वाधिक आहे. या रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असल्यामुळे भविष्यात पर्यटनाला वाव मिळणार आहे. प्रवाशांना सुविधा मिळाल्यानंतर पुन्हा भाविकांची संख्या दुप्पट होईल, अशी सकारात्मक भूमिका प्रशासनाकडून राबविली जात आहे.