जेजुरी रेल्वे स्थानकासाठी 14.7 कोटी – सुप्रिया सुळे

0

जेजुरी : जेजुरी रेल्वे स्थानकाची दुरुस्ती करणे आणि त्याला मल्हारगडाची प्रतिकृती बनविणे, तसेच कामगारांसाठी वसाहत उभी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून जेजुरी रेल्वे स्थानकासाठी 14 कोटी 70 लाख रुपये मंजूर झाले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
जेजुरी हे महाराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या एक महत्त्वाचे देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच देशभरातून या ठिकाणी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे येथील रेल्वेस्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणारच, असा निर्धार सुळे यांनी केला आहे. त्यासाठी त्या रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

रेल्वे कामगारांसाठी उभारणार निवासी वसाहत

मंजूर झालेल्या या 14 कोटी 70 लाखाच्या निधीतून जेजुरी रेल्वे स्थानकास मल्हारगडाची प्रतिकृती बनवायचे आहे. तसेच, प्लॅटफार्म उंची वाढवणे, सर्वोत्तम दर्जाची फरशी बसविणे, उत्तम प्रकाश व्यवस्था, स्वच्छ आणि पुरेशी पाण्याची व्यवस्था, महिला आणि पुरुष प्रवाशांसाठी स्वतंत्र आराम कक्ष, स्वच्छतागृह उभारणी आदी कामे करण्यात येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वे कामगारांसाठी निवासी वसाहत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.