पुरंदर तालुक्याच्या दौर्यादरम्यान रेल्वेस्थानकाची पाहणी : केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
जेजुरी : पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आणि खंडेरायाची राजधानी असलेल्या जेजुरी येथील ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाचा विकासकामांच्या माध्यमातून चेहेरामोहरा बदलत आहे. रेल्वेस्टेशन अत्याधुनिक करण्यासाठी व सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. स्थानिक नगरसेविका अमिना पानसरे व माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्या पाठपुराव्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनातून 2 कोटी 27 लाख रुपयांची विविध विकासकामे रेल्वेस्थानकात सुरू करण्यात आली आहेत. खासदार सुळे पुरंदर तालुक्याच्या दौर्यावर असताना त्यांनी रेल्वेस्थानकाला भेट देत विविधकामांची माहिती घेत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडेपाटील, डॉ. दिंगबर दुर्गाडे, सचिन टेकवडे, रोहिदास कुदळे, संजय माने, नगरसेविका अमिना पानसरे, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे आदी उपस्थित होते.
209 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा
जेजुरी शहरामध्ये विविध सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात तसेच खंडोबा मंदिर, गडकोट, पायरीमार्ग यांची डागडुजी-दुरुस्ती व विकासकामांकडे बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. पुणे जिल्हाधिकार्यांच्या विभागाकडून सुमारे 209 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार होत आहे. सर्वांना विश्वासात घेऊन विकासकामे करण्यात येणार आहेत. आपत्कालीन रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच देवसंस्थानला अद्ययावत रुग्णवाहिका लवकरच देण्यात येणार, असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
भुयारी मार्गाची मागणी
सोमवती अमावस्येला खंडोबा देवांचा पालखी सोहळा कर्हास्नानासाठी मार्गस्थ होतो. तेथे जाताना रेल्वेमार्ग ओलांडावा लागतो. यावेळी सोहळ्यासमवेत हजारो भाविक असतात. भविष्यात अमृतसरसारखी दुर्देवी घटना येथे घडू नये यासाठी मार्गावरील दोन ठिकाणी भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी मेहबूब पानसरे व डॉ. दिंगबर दुर्गाडे यांनी केली. ही सुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खासदार सुळे यांनी दिले. नगरसेविका अमिना पानसरे यांनी स्वागत, तर स्टेशनमास्तर गुजरमल मीना यांनी आभार मानले.
स्थानकाला गडकोटांच्या प्रतिकृतीचा आकार
रेल्वेस्थानकाला ऐतिहासिक खंडोबा गडकोटांच्या प्रतिकृतीचा आकार देण्यात येणार असून स्वागतकमानींना दीपमाळाचा आकार देण्यात येणार आहे. त्यासाठी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी ज्येष्ठ शिल्पकार दिनकर थोपटे यांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे व शेडच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, अशी माहिती प्रवीण शिंदे यांनी दिली.