जेट एअरवेजमधील केबिन क्रूच्या चुकीमुळे प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त

0

मुंबई : जेट एअरवेजमधील केबिन क्रूने केलेल्या एका चुकीमुळे विमानातील शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. विमानातील केबिन क्रूने हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच ऑन करण्यास विसरल्याने विमानातील हवेचा दाब वाढला आणि प्रवाशांच्या कान आणि नाकातून रक्त वाहू लागले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. त्यामुळे विमानाचं मुंबई विमानतळावर पुन्हा लँडिंग करण्यात आलं. आज पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली.

मुंबई विमानतळाहून जेट एअरवेजच्या मुंबई-जयपूर विमानाने उड्डाण घेतलं होतं. टेकऑफच्या वेळी विमानातील हवेचा दाब नियंत्रित करणारं बटन स्वीच ऑन करण्यास केबिन क्रू विसरला. त्यामुळे विमानात असणाऱ्या १६६ प्रवाशांपैकी ३० प्रवाशांच्या नाका-तोंडातून रक्त वाहू लागले. काही जणांना डोकेदुखीचा त्रास झाला तर काहींना मळमळ होऊ लागली. हा प्रकार अचानक सुरू झाल्याने विमानामध्ये एकच घबराट पसरली. त्यामुळे हे विमान पुन्हा माघारी वळवण्यात आलं आणि मुंबई विमानतळावर त्याचं लँडिंग करण्यात आलं. त्यानंतर या प्रवाशांना विमानतळावरील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेची विमानतळ प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून केबिन क्रूला निलंबित केलं आहे.