जेट एयरवेजचे संस्थापक नरेश गोयल ताब्यात

0

मुंबई: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतले आहे. गोयल यांची त्यांच्या बलार्ड इस्टेट कार्यालयामध्ये चौकशी करण्यात आली होती. त्या नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोयल यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोयल यांना ईडीच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याघरी नेत घराची तपासणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली.

जेट एअरवेज आणि गोयल यांची ‘फेमा’अंतर्गत चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा ईडीचा विचार आहे. जेटच्या १२ वर्षांपासूनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ईडीकडून सुरू आहे. ईडीने आतापर्यंत गोयल यांनी अनेकवेळा चौकशी केली आहे.

ईडीने गोयल यांच्या पत्नी आणि मुलाची दोन ते तीन वेळा चौकशी केली आहे. गोयल यांच्या १९ बोगस कंपन्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी १४ कंपन्या भारतात, तर उर्वरित पाच कंपन्या परदेशात आहेत.