जेठ, भावजयीचा एकत्र गळफास

0

चोपडा । तालुक्यातील बोरअजंटी येथे जेठ आणि भावजयीने एकत्र गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृत्यूला कवटाळण्याआधी त्यांनी पाच पानी पत्राच्या माध्यमातून शिवदास भिका कोळी आणि भारतीय रोहिदास कोळी यांनी आपल्या एकमेकांवरील निस्सीम प्रेमाची ग्वाही दिली आहे. त्यांनी निंबाच्या झाडाला एकाच दोराच्या दोन्ही टोकाचा वापर करून गळफास घेतला. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. “आम्ही एकमेकांवर प्रेम केलं, ते कसं झालं माहीत नाही. आमचा एकमेकांत एवढा जीव गुंतला की आम्ही कोणाचा विचार न करता आत्महत्या करत आहोत… ” असे त्यांनी ‘प्रतिज्ञापत्र’ या नावाने लिहलेल्या चिठ्ठ्यांमध्ये नमूद केले आहे.

काय आहे प्रकरण
बोरअजंटी येथील शिवदास भिका कोळी (वय 28) याचा लहान भाऊ रोहिदास याच्यासोबत भारतीचा सहा महिन्यापुर्वी विवाह झाला होता. भारती ही शिवदास याची मावस मामाची मुलगी आहे. शिवदास याचेही लग्न झालेले आहे. भारती आणि शिवदास यांची एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र तसे न झाल्यामुळे ते अस्वस्थ होते. भारतीचेही शिवदासवर प्रेम होते. त्यांचे त्याच्या मनाविरुद्ध लग्न झाले होते. त्यांनी आज स्वतःच्या शेतात आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्यांनी एकाच दोराच्या टोकाला झाडाला बांधून आत्महत्या केली.

हिंदी व मराठीत चिठ्ठया
पोलिसांना त्यांच्या एकूण पाच चिठ्या सापडल्या आहेत. ’प्रतिज्ञापत्र’ असे लिहिलेल्या एका चिट्ठीत त्यांनी आम्ही एकमेकांवर खूप प्रेम केले असून आज आम्ही दोघे स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. यासाठी कोणीही दोषी नाहीत असा उल्लेख केला आहे. भारतीने हिंदीत तर शिवदासने मराठीत चिठ्ठी लिहिली आहे. यात भारतीने अतिशय भावनाशील रितीने आपण शिवसादशिवाय राहू शकत नसल्याचे सांगितले आहे. तर शिवदासनेही आपल्या प्रेमाची माहिती देत दोघांच्या मृत्यूसाठी इतरांना कुणालाही दोषी न धरण्याचे नमूद केले आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनस्थळाची पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रवीण साहेबराव सुलताने यांनी या घटनेची माहिती दिली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास एपीआय केलसिंग पावरा, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत ठाकूर करीत आहेत.

कुटुंबिय सुन्न
मंगळवारी सकाळी शिवदास आणि भारती यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या आघाताने कोळी कुटुंबिय अक्षरश: सुन्न झाल्याचे दिसून येत होते. या आत्महत्येमुळे शिवदासचा परिवार उघड्यावर आला असून त्याचा भाऊ राहिदास यानेही जीवनसंगिनी गमावली आहे. यामुळे या दुर्घटनेमुळे कोळी कुटुंबावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे बोरअजंटीसह परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अत्यंत शोकाकुल वातावरणात शिवदास कोळी आणि भारती कोळी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.