पाटणा: जनता दल युनायटेड पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेडीयूचे माजी उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत किशोर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वी चंपारण्य जिल्ह्यातील एका इंजिनियरने ‘बिहार की बात’ या त्यांच्या कॅम्पेनची प्रशांत किशोर यांनी चोरी केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या विरोधात कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पाटणा पोलिसांना देण्यात आलेल्या एफआयआरमध्ये प्रशांत किशोर यांच्यासोबत पाटणा विद्यापीठातील विद्यार्थी नेता ओसामा याचेसुद्धा नाव आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करणारे इंजिनियर शाश्वत गौतम यांनी सांगितले की, ‘काही काळापूर्वी मी ‘बिहार की बात’ नावाचा एक प्रोजेक्ट बनवला होता. त्याच्या लाँचिंगची तयारी सुरू होती. त्यादरम्यान माझ्याकडील एक कर्मचारी ओसामा याने नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर ओसामा याने बिहार की बात कँपेनचा संपूर्ण कंटेंट प्रशांत किशोर यांना दिला. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी तो आपल्या वेबसाइटवर टाकून ब्रँडिंग सुरू केले असल्याचे म्हटले आहे.
मी माझ्याकडील संपूर्ण कंटेंट जानेवारी महिन्यात आपल्या वेबसाईटवर अपलोड केला होता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी फेब्रुवारी महिन्यात आपली वेबसाईट लाँच केली, असे शाश्वत गौतम यांनी सांगितले. दरम्यान, बिहार की बात या कार्यक्रमाचे संपूर्ण डिझाइन आपण प्लॅन केले होते, असा दावाही गौतम यांनी केला आहे.आता या प्रकरणी पाटणा येथील पाटलीपुत्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर भादंवि कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.