जेडीयू आणि आपचा कोविंदना पाठिंबा

0

नवी दिल्ली । राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांची मोट बांधत सहमतीचा उमेदवार ठरवण्यासाठीच्या काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांच्या प्रयत्नाला मोठा धक्का बसला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आम आदमी पक्षाने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पाटण्यात पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. तर आपच्या बैठकीतही कोविंद यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी जाहिर केले आहे.

भाजपची बाजू आणखी भक्कम
नितीश कुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा विरोधी पक्षांच्या एकजुटीला मोठा धक्का समजला जातो आहे. याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊ भाजपचा सामना करावा, अशी भूमिका नितीश कुमार यांनी घेतली होती. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना औपचारिक पाठिंबा दिल्याने कोविंद यांची बाजू आणखी भक्कम झाली आहे. यामुळे कोविंद यांच्या पारड्यात जवळपास 70 टक्के मते जाण्याची शक्यता आहे.

द्रमुकही कोविंद यांच्या पाठिशी?
तामिळनाडूमधील द्रमुक पक्षदेखील आता कोविंद यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे. येत्या 29 जूनला विरोधीपक्षाचा सहमतीचा उमेदवार ठरणआर आहे. काँग्रेस नेतृत्त्वाकडून गुरुवारी विरोधी पक्षांची बैठक घेतली जाऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

दोन कारणांमुळे पसंती
‘रामनाथ कोविंद बिहारचे राज्यपाल होते आणि त्यांनी राज्यपालपदी असताना कधीही सरकारसाठी अडचणी निर्माण केल्या नाहीत या दोन कारणांममुळे नितीश कुमार यांनी त्यांच्या नावाला समर्थन देत असल्याचे पक्षाच्या नेत्यांना सांगितले. यासोबतच कोविंद यांनी कुलगुरुंच्या निवडीलादेखील कधीच आक्षेप घेतला नाही,’ असे नितीश कुमार यांनी म्हटले.