जळगाव। जेनेरिक औषधांची करण्यात आलेली सक्ती, शासनाचा दुकानांसाठी आटापिटा हे सगळे जनतेच्या आरोग्यासाठी आहे, जेनेरीक औषधीं धोरणाचा फायदा राज्यातील 10 टक्के गरीबांना होणार आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी बाजारात येणार्या सर्व पिकांना योग्य भाव देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे,अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
बियाणे व खते पाच वर्षे स्थिर
महाराष्ट्रात खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन कमी व खर्च जास्त लागत होता मात्र राज्यात सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले असून उत्पादन खर्च कमी व पिकांचे उत्पादन जास्त आहे. शेतकर्यांना मुबलक बियाणे, रासायनिक खते अत्यल्प दरात उपलब्ध असून भाव पाच वर्षापर्यंत वाढणार नाही. तूरीच्या भावासाठी विरोधकांकडून आवाज उठवला जात आहे. ज्यावेळी तुरीच्या डाळीची मोठ्या प्रमाणावर कमतरता होती त्यावेळी तूर लागवडीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यात आले होते त्यामुळे आता लाखो टन तूर खरेदी केली जात आहे. कापसालाही यावर्षी योग्य भाव देण्यात आल्याचे यावेळी राज्यमंत्री अहिर यांनी सांगितले.