जेरुसलेम – मुस्लिमांसाठी हराम अल शरीफ आणि ज्यूंसाठी टेंपल माउंट या धार्मिकदृष्ट्या पवित्र मानल्या जाणाऱ्या स्थळी शुक्रवारी तीन हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधूंद गोळीबारात तीन इस्त्रायली नागरिक जखमी झाले आहेत. हल्लेखोरांना सुरक्षा रक्षकांनी ठार केले.
हल्लेखोर मुस्लिम आणि ज्यू मानीत असलेल्या पवित्र स्थळांकडून जुन्या शहराच्या दरवाजांकडे गेले. त्यानंतर पोलिसांवर त्यानी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाले. याबाबत पॅलेस्टाईनकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.
जुने शहर आणि पवित्र ठिकाण पूर्व जेरुसलेममध्ये आहेत. १९६७ मध्ये इस्त्रायलेने मध्यपूर्व युद्धानंतर पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतले आणि संपूर्ण जेरुसलेम इस्त्रायलची राजधानी आहे असे जाहीर केले. याला आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध झाला. वेस्ट बँक आणि गाझा पट्टीतील त्यांच्या देशाची राजधानी पूर्व जेरुसलेम बनवायची असा पॅलेस्टीनी नेत्यांचा निर्धार आहे. पॅलेस्टीनी ऑथोरोटीचा अमल अल्प प्रमाणात वेस्ट बँकवर आहे.
इस्त्रायलने दहशतीचे प्रकार पॅलेस्टाईनी नेत्यांच्या प्रोत्साहनाने घडत आहेत असा आरोप केला आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न २०१४ मध्ये फोल ठरला.