अलिबाग । अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील आदिवासी वाडीवर 35 वर्षीय इसमाची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जेवणाच्या वादातून हा खून झाल्या असल्याचा अंदाज पोलीसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीसांकडू मिळालेल्या माहितीनुसार अनिल उर्फ पिंट्या अंकुश वाघमारे असे या मृताचे नाव आहे.
तालुक्यातील परहूरपाडा गावातील कोपरडुंग आदिवासी वाडीवर हा राहत होता. शनिवारी 16 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोपरडुंगी आदिवासी वाडीवरील लक्ष्मण शंकर नाईक यांच्या घरात धारदार अशा शस्त्राने अनिल वाघमारे याचा खून करण्यात आला. त्याला मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह खदानी शेजारील खड्ड्यात टाकून दिला. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. पोयनाड पोलिसांनी तातडीने तपास करून विनोद नाईक (45) याला चरी येथून तर दिनेश उर्फ पप्या नाईक (40) आणि सुनीता नाईक (34) या दोघांना शहापूर खाडी येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.एल. शेवाळे करीत आहेत.