कांताई बंधार्यावरील घटना ः पाळधीच्या जैन इरिगेशनच्या कामगाराचा मृत्यू
जळगाव:कुटुंबियांसोबत दुचाकीवर कांताई बंधार्यावर फिरणासाठी गेलेल्या मुकेश मोरे (वय-22) रा. पाळधी ता.धरणगाव या तरुणाचा पाय घसरुन बंधार्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. घडली आहे. दरम्यान मुकेश हा जेवणाचा डबा धुण्यासाठी बंधार्याच्या काठावर गेला, पाय घसरल्याने पाण्यात पडला, व जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. तरूणाचा मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू आहेत.
जेवणानंतर डबा धुण्यासाठी गेले काठावर
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुकेश मोरे (वय-22) रा. पाळधी ता.धरणगाव हे जैन इरिगेशन कंपनीत एसडब्ल्यूआर ईलेक्ट्रिक विभागात गेल्या चार वर्षांपासून नोकरीला आहे. ते पत्नी व दोन मुलांसोबत दुचाकीने कांताई बंधार्यावर फिरण्यासाठी गेले होते. दुपारी जेवण झाल्यानंतर जेवणाचा डबा धुण्यासाठी कांताई बंधार्याच्या किनार्यावरून खाली उतरले. दरम्यान, त्यांचा पाय घसरल्याने ते वाहत्या पाण्यात पडले. पाण्याचा वेग जास्त असल्याने ते पाण्यात वाहून गेले. दरम्यान, पती मुकेश पाण्यात पडल्याचे लक्षात येताच पत्नीने आरडाओरड केल्याने परिसरातील काही नागरिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच जि.प.सदस्य प्रताप पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच सोपान पाटील, पाळधी बुचे सरपंच चंद्रकांत पाटील, पाळधी पोलीस स्टेशनेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. सायंकाळी 7 वाजेपर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.